मंगळवेढा:-
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण व सगे सोयरे अद्यादेश अंमलबजावणी मागणीसाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातुन एक लाख मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी सोलापूर मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार म्हणाले की संविधानिक आरक्षण देण्याची जबाबदारी सर्वपक्षीयांची आहे तरी सत्ताधारी व विरोधकांनी हा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा असे सांगितले.
सदर शांतता रॅलीसाठी प्रत्येक गावातून जोरदार तयारी केली जात असून महिला भगिनी व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात ५८ मोर्चे शांततेत काढण्यात आले होते.तसेच अनेक वेळा शांततेतच आमरण उपोषण,आंदोलणे करण्यात आली असताना देखील सत्ताधारी पक्ष असो अथवा विरोधी पक्ष असो मराठा आरक्षणासाठी आळी मिळी गुप चिळी अशी भूमिका घेत आहे.
आता मात्र मराठा सामाजाची सहनशीलता संपली आहे.आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जेवढी सत्ताधारी पक्षाची भूमिका महत्वाची आहे तशी विरोधकांची देखील भूमिका महत्वाची आहे हेच ठणकावून सांगण्यासाठी शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाची मते आपल्याला मिळावीत म्हणून धडपडत असतात मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढे उघडपणे भूमिका घेत नाही आता येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षांना मराठा समाजाची ताकत दाखविण्याची वेळ आली आहे.
यासाठी शांतता रॅलीसाठी बहुसंखेने मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाज उपस्थित राहणार आहे सदर शांतता रॅली सकाळी ११ वाजता सोलापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने समारोप होणार आहे.
याप्रसंगी व्यासपीठावरती पुरुषोत्तम बरडे,विनोद भोसले,शिवाजी चापले,माऊली पवार,महेश पवार,गणेश देशमुख,सदाशिव पवार,श्रीरंग लाळे,सचिन पवार,बबनराव आवताडे आदीजन उपस्थित होते.
मराठा समाजातील सर्व व्यावसायिक,सामाजिक संस्था,संघटना,राजकीय पक्ष यांनी स्वयंस्फूर्तीने शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र कोणताही राजकीय पक्ष त्याचे नाव,चिन्ह,पद बाजूला ठेवून एक मराठा सेवक म्हणून समाजासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी नगरसेवक आमदार,खासदार,पदाधिकारी यांनी देखील सहभागी व्हावे अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.1 ऑगस्ट रोजी मूढवी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे असे महेश रोकडे मेजर यांनी सांगितले.