प्रा.विनायक कलुबर्मे यांचा आपल्या वाढदिवसा दिवशीच सपत्नीक मरणोत्तर देहदानाचा संकल्प. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ३० जुलै, २०२४

प्रा.विनायक कलुबर्मे यांचा आपल्या वाढदिवसा दिवशीच सपत्नीक मरणोत्तर देहदानाचा संकल्प.

 


मंगळवेढा:- 

श्री संत दामाजी महाविद्यालय येथे कार्यरत असणारे वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक मनोहर कलुबर्मे यांनी आपल्या ३० जुलै या वाढदिवसाच्या दिवशीच सपत्नीक मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असून पत्नी प्रा.रुपाली कलुबर्मे यांची स्वाक्षरी असलेले मरणोत्तर देहदान संबधीचे लेखी प्रतिज्ञा पत्र सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागाचे समीर साळुंखे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.


विशेष बाब म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करणारे व मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणारे कलुबर्मे दांम्पत्त्य मंगळवेढा तालुक्यातील पहिलेच दांम्पत्त्य ठरले आहे.


सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या प्रा.कलुबर्मे यांना देहदानाबाबत विचारले असता ते म्हणाले खरं तर कुष्ठरोग्याची सेवा करणारे बाबा आमटे यांचा लेख माझ्या वाचण्यात आला होता त्यात बाबांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाला अग्नी देऊ नका तर जमीनीच्या खाली गाडून टाका कारण जमीनीच्या पोटात असंख्य जीव,सूक्ष्म कीटक असतात त्यांना माझ्या देहाचा उपयोग खाद्य म्हणून होईल म्हणजेच आपल्यानंतर सुद्धा आपल्या देहाचा उपयोग दुसऱ्यासाठी व्हावा हा किती मोठा विचार आहे आणि यातूनच हा मानस मनी ठेवून देहदानाचा निर्धार केले असल्याचे त्यांनी सांगितले.


याआगोदरही कलुबर्मे पती-पत्नी यांनी वारी परिवार या सामाजिक संस्थेकडून मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.प्रत्येक माणसाला मरण अटळ आहे आपण गेल्यानंतर आपल्या देहाची राख करून ती राख नदीत टाकून पाणी प्रदूषीत करण्यापेक्षा आपल्या नंतरही आपल्या देहाचा उपयोग वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या भावी डॉक्टरांसाठी होत असेल तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही म्हणूनच आम्ही दोघानीही देहदानाचा संकल्प केला आहे असे सांगितले.


यावेळी डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्यांना आभारपत्र,ओळखपत्र देऊन त्यांचे आभार मानले यावेळी शरीरशास्त्र विभागाचे समीर साळुंखे,प्रा.धनाजी गवळी,अरुण गुंगे,वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू उपस्थित होते.


test banner