मंगळवेढा (प्रतिनिधी) :
येथील सि.बा. यादव प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सल्लागार डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले आहे.
जवाहरलाल शेतकी हायस्कूल, मंगळवेढाचे माजी मुख्याध्यापक सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ स्थापन केलेल्या गुरुवर्य सि.बा. यादव प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून एस.एस.सी. परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते.
जीवनाला उदात्तता व प्रतिष्ठा देण्याचं काम शिक्षण करते. ज्ञानाच्या प्रचितीने जीवनाचा मार्ग सुकर होतो. अशा ज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या सि. बा. यादव सरांच्या नावे असलेल्या प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. गुणवंतांचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्यातून पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हीच धडपड घेऊन प्रतिष्ठानचे कार्य चालू आहे. डॉ. भीमाशंकर बिराजदार, ज्ञानोबा फुगारे, त्र्यंबक कोंडूभैरी हे प्रतिष्ठानचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
यापूर्वीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, राज्य संपादक संजय आवटे, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, ह. भ. प. डॉ.जयवंत महाराज बोधले आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
सन २०१६ पासून प्रतिष्ठानचे कार्य सुरु असून प्रतिष्ठानचे यंदाचे दहावे वर्ष आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान काम करीत आहे. शैक्षणिक वर्ष २०१७ पासून प्रतिष्ठानच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि कला गुणांच्या वाढीसाठी धडपडणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतूने राज्य तसेच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांकडून गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच गेल्या वर्षीपासून प्रतिष्ठानच्यावतीने आदर्श इंग्रजी शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापक यांचाही विशेष सन्मान व गौरव करण्यात येत आहे. शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपले सविस्तर प्रस्ताव दिनांक १० मे, २०२५ पर्यंत गणेश यादव, जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढा जिल्हा सोलापूर, पिन कोड-४१३३०५, मो.९८६०००१२९२ या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले आहे.