कारखानदार उमेदवारांना मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही - शैलाताई गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

कारखानदार उमेदवारांना मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही - शैलाताई गोडसे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने कारखानदार उमेदवार आणि सर्व स्टार प्रचारक नेते मंगळवेढ्याच्या दुष्काळी 35 गावांचा पाणी प्रश्न मोठ्या चवीने चघळत आहेत. पण या उमेदवारांना हा नेमका पाणीप्रश्न काय आहे हे तर माहित आहे काय? तो सोडविण्यासाठी या उमेदवारांनी काडीचाही प्रयत्न केला नसल्यामुळे त्यांना दुष्काळी 35 गावांच्या पाणीप्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही अशी टीका अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांनी केली आहे. नंदेश्वर ता. मंगळवेढा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत्या. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख हे उपस्थित होते.


   पुढे बोलताना गोडसे म्हणाल्या, कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार संघर्ष, प्रयत्न करावा लागतो. मी दुष्काळी 35 गावांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेवर प्रकाश टाकण्यासाठी ही योजना नेमकी काय आहे हे  सांगण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घराचा उंबरा झिजविला आहे. तसेच या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी नंदेश्वर येथे आंदोलन केले. या 35 गावातीलच 11 गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत समाविष्ट आहेत. या अकरा गावांचा प्रमुख केंद्रबिंदू असणाऱ्या शिरनांदगी तलावातच पाणी येण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनाचीच प्रचिती होत म्हैसाळ योजनेच्या इतिहासात गतवर्षी शिरनांदगी तलावात पाणी पोहोचले. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील आठ गावांचा म्हैसाळ योजनेतील नव्याने समावेश होण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. आता या गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीने अथवा आता या पोटनिवडणुकीत उभारलेल्या उमेदवाराने कसलाही पाठपुरावा केला नाही परंतु मी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच की योजना आता काही दिवसात सुरू होणार आहे. एवढा मोठा संघर्ष मी मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागाच्या आणि पाणीप्रश्‍नासाठी केला आहे. पण सध्या उभारलेल्या कारखानदार उमेदवारांना मुळात हा पाणीप्रश्न किती गावांचा आणि काय आहे हे माहीत नाही. तो सोडवायचा कसा हा नंतरचा भाग आहे. एक जिल्हा परिषद सदस्य असताना मी एवढा संघर्ष केला आहे माझा आवाज जर विधानसभेत घुमला तर मंगळवेढा तालुक्यात पर्यायाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रश्नच शिल्लक ठेवणार नाही असेही आवाहन यावेळी बोलताना शैलाताई गोडसे यांनी केले.

test banner