सी ए परीक्षेच्या यशामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाचा मोठा वाटा :- प्रवीण माळी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ११ जुलै, २०२५

सी ए परीक्षेच्या यशामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाचा मोठा वाटा :- प्रवीण माळी.


मंगळवेढा:- 

माझ्या सी.ए.परीक्षेच्या यशामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे असे मत नुकतीच सी.ए.परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रवीण पंडित माळी यांनी व्यक्त केले ते श्री संत दामाजी महाविद्यालयात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.


सुरुवातीस श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा,सचिव किसनराव गवळी,प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव यांच्या हस्ते प्रवीण माळी व वडील पंडित माळी यांचा सन्मान करण्यात आला.


महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून यावेळी प्रवीण माळी म्हणाले की माझी पूर्वीची ओळख प्रवीण पंडित माळी होती पण आता मात्र सीए प्रवीण पंडित माळी अशी ओळख निर्माण झालेली आहे.


सीएची परीक्षा देत असताना माझ्यापुढे अनेक आव्हाने उभी होती तरी सुद्धा अशा संकटांना न घाबरता संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश प्राप्त केलेले आहे.


विद्यार्थ्यांची वयोवर्षे वीस ते तीस ही खूपच महत्त्वाची वर्ष असुन जीवनातील असणारा टर्निंग पॉईंट याच वर्षांमध्ये होऊ शकतो त्यासाठी नियमित 12 ते 15 तास अभ्यास करणे आवश्यक आहे.


त्याचबरोबर घरापासून दूर राहिल्यास बाहेरच्या जगामध्ये अनेक गोष्टी शिकता येतात एखादी गोष्ट सुरुवात करणे आवश्यक आहे असे सांगून मार्गदर्शन करणाऱ्या श्री संत दामाजी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे आभार मानले.


यावेळी राहुल शहा म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःपुढे ध्येय व स्वप्न ठेवून त्या ध्येयापर्यंत आणि स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे आणि प्रवीण सारख्या माजी विद्यार्थ्याकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन आपली शैक्षणिक वाटचाल चालत राहा असे सांगून प्रवीणचे अभिनंदन केले तर प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले मुलांनी परिस्थितीचे भान राखून आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे प्रवीण सारख्या विद्यार्थ्यांने दाखवून दिले असुन यामुळे निश्चितच महाविद्यालयाचा नवलौकिक वाढलेला आहे असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.गणेश भुसे,प्रा.धनंजय गवळी,प्रा.धनंजय मेहेर,प्रा.दादासाहेब देवकर,प्रा.संगाप्पा पाटील यांचेसह बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.


test banner