मंगळवेढा:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 64 हजार 720 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटातून जात आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आणि पशुधनासमोर पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,या भावनेतून महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील शिक्षकांनी एकत्र येत ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली शिक्षकांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांबाबतही आपली संवेदनशीलता आणि बांधिलकी जपली आहे.
त्यांच्या या उपक्रमातून समाजातील इतर घटकांनाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची प्रेरणा मिळणार आहे दुष्काळाचा सामना करूया बळीराजाला आधार देऊया या भावनेतून केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून महाविद्यालयाच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविणारा आहे.
