मंगळवेढा:- शहरातील आठवडा बाजारात दर सोमवारी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या खिशातील तसेच हातातील मोबाईल चोरांकडून लंपास केले जात असून,या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचा फायदा मोबाईल चोरांकडून घेतला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दर सोमवारी लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत असताना,या घटनांना आळा घालण्यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनकडून ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.
मोबाईल चोरीच्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याऐवजी नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.
आठवडा बाजारातील मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त करावे, साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता मंगळवेढा पोलीस स्टेशन या वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच आतापर्यंत गेलेले मोबाईल नागरिकांना परत मिळणार का अशी विचारणा करण्यात आली.या संदर्भात मंगळवेढा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी सचिन डोराले,सचिन नागणे,क्रांती दत्तू,सोमनाथ बुरजे,सतीश दत्तू,अमोल सातपुते,राजवीर हजारे,देवदत्त पवार,महेश नागणे,शंकर गोवे,ईश्वर नामदे यांचेसह समस्त मंगळवेढेकर उपस्थित होते.
