प्रतिनिधी
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कार्य आदर्शवत– माजी आमदार दत्तात्रय सावंत
कोल्हापूरचे हास्यसम्राट प्रा .रणजीत अंबाजी यांचा हास्यपंचमी कार्यक्रम संपन्न
मंगळवेढा : पतसंस्थांनी केवळ नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता सभासदांच्या हितासोबतच समाजासाठी आदर्श निर्माण करणारे काम करावे, असाच आदर्श श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे असे अध्यक्षीय मनोगत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा तसेच मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आयोजित २० व्या वार्षिक सर्वसाधारण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंगळवेढ्यातील जोगेश्वरी मंगल कार्यालय, पंढरपूर बायपास रोड येथे रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लोकशाहीर प्रा. रणजित आशा अंबाजी, सुप्रसिद्ध व्याख्याते तथा हास्यसम्राट, कोल्हापूर उपस्थित होते.
यावेळी जि.प. सदस्य प्रदीप खांडेकर, जि.प. सदस्या करुणा शिवशरण, नगरपालिका शिक्षण समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, पं. स. सदस्य विनायक यादव, पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे, प . स . सदस्य श्रीकांत गणपाटील, प्रशासनाधिकारी बिभीषण रणदिवे, शिक्षक नेते संजय चेळेकर , चेअरमन प्रदीप यादव, व्हाईस चेअरमन धर्मराज जाधव व संचालक मंडळासह मानवर उपस्थित होते .
कमी व्याजदरात कर्ज देण्याचा प्रयत्न
सावंत म्हणाले, पतसंस्थांच्या कार्यपद्धतीत सामाजिक बांधिलकीला महत्त्व दिले पाहिजे. आज अनेक पतसंस्था सुमारे १४ टक्के व्याजदराने कर्ज देतात; मात्र काही संस्था सभासदांना केवळ ८ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे
शिक्षकांनी आपल्या आचार-विचार आणि कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. भविष्यात केवळ स्वतःची संस्था उभी करण्यापेक्षा इतरांसाठी आदर्श ठरेल, अशी संस्था उभी करण्याची गरज आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
मंगळवेढ्याची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा
मंगळवेढा हे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेसाठी विशेष ओळखले जाते. मागील २५ ते ३० वर्षांपासून येथे शिक्षण क्षेत्रातील गुरुजनांचा सत्कार करण्याची परंपरा सुरू आहे. अनेक गुरुजनांनी ताकदीने आणि योगदानाच्या भावनेने काम केले असून त्यांचा कार्याचा वारसा आजही पुढे नेला जात आहे.
शासनाकडून आदेश आल्यानंतर केवळ कागदोपत्री काम न करता मंगळवेढ्यात शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. प्रत्येक आई-वडिलांचे आपल्या मुलाने मोठे व्हावे, त्याचे स्वप्न साकार व्हावे, असे स्वप्न असते. हे स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या चांगल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी सोमनाथ आवताडे , 'करुणा शिवशरण, जयश्री कवचाळे , बिभिषण रणदिवे यांनी मनोगतातून संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आदर्श शिक्षक , शिष्यवृत्ती मार्गदर्शक व आदर्श शाळांचे अभिनंदन केले .
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी टीमवर्क आवश्यक – संजय चेळेकर
संजय चेळेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढीसाठी प्रशासन, पदाधिकारी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.
नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती—सर्वांनी एकत्रितपणे चांगले टीमवर्क उभे केले, तर त्याचा सकारात्मक परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होईल. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी केवळ पैसा खर्च करणे पुरेसे नसून योग्य नियोजन, प्रामाणिक प्रयत्न आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांना वेगळे न मानता सर्वांनी एकत्र येऊन शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी काम केले पाहिजे. दामाजी पतसंस्थेसारख्या संस्थांनी समाजात आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे, इतरांनी असा आदर्श घेऊन काम करावे असेही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
“आपण जे काम करतो, ते गुणवत्तेचे असले पाहिजे. आजची गुणवत्ता हीच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
वार्षिक सभेत आर्थिक विषयांवर चर्चा
संभाजी तानगावडे यांनी प्रास्ताविक केले . मोहन लेंडवे यांनी अहवाल वाचन केले .
यावळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक अर्जुन आवताडे व योगेश माने यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी १५ शिक्षकांना महात्मा फुले आदर्श शिक्षक , तीन शाळांना महात्मा फुले उत्कृष्ट शाळा व जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .
*रणजित अंबाजी यांच्या व्याख्यानाने रंगत*
श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने स्वखर्चातून व्याख्यानाची मेजवानी सभासद बंधू भगिनींना दिली हे विशेष या ठिकाणी जाणवल्याचे व्याख्याते रणजीत अंबाजी यांनी नमूद केले .
प्रमुख अतिथी कोल्हापूरचे प्रा. रणजित आशा अंबाजी यांनी आपल्या खास शैलीतील व्याख्यानातून उपस्थितांचे मनोरंजन करत सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. सर्व सभागृह त्यांनी पूर्ण एक तासभर हास्यकल्लोळात नेले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर्जेराव रुपनर यांनी केले .
कार्यक्रमास शिक्षक सभासद बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या वतीने लकी ड्रॉ आयोजन केले होते . समारोपावेळी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


