शिक्षकांच्या कर्तृत्वाला लोकमंगल बँकेचा सलाम; १५ आदर्श शिक्षकांचा गौरव - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

शिक्षकांच्या कर्तृत्वाला लोकमंगल बँकेचा सलाम; १५ आदर्श शिक्षकांचा गौरव

 



प्रा. विश्वनाथ ढेपे यांच्या खुमासदार वक्तृत्वाने रंगला सोहळा; शिक्षकांच्या कार्याचा सन्मान ही समाजाची जबाबदारी असल्याचा मान्यवरांचा सूर



मंगळवेढा : ज्ञानदानातून भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने लोकमंगल को-ऑप. बँक लि., सोलापूर, शाखा मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी नगर वाचनालय, चोखामेळा चौक, मंगळवेढा येथे मोठ्या उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध शाळांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा (आबी) बबनराव आवताडे होत्या. पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली आनंद ताड, नगरपालिका शिक्षण समितीचे सभापती श्री. सोमनाथ विष्णूपंत आवताडे, ॲड. श्री. रमेश जोशी, लोकमंगल को-ऑप. बँकेच्या संचालिका सौ. उज्वला संजय चेळेकर, सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विश्वनाथ ढेपे तसेच शिक्षक नेते श्री. संजय चेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


१५ शिक्षकांच्या कार्याचा गौरव


शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या श्री. राकेश औदुंबर गायकवाड (जि.प. प्रा. शाळा, साखर कारखाना), श्री. अशोक गजानन शिंदे (जि.प. प्रा. शाळा, आसबेवाडी), श्री. सर्जेराव दशरथ रुपनर (जि.प. प्रा. शाळा, कचरेवाडी), श्री. महेंद्र महादेवराव अलोकार (जि.प. प्रा. शाळा, नंदूर), श्री. शरद गौरवनाथ पाटील (जि.प. प्रा. शाळा, डिकसळ), श्री. दशरथ लक्ष्मण गणपाटील (जि.प. प्रा. शाळा, सांगोलकरवस्ती), सौ. मनिषा सुखदेव सांगोलेकर (जि.प. प्रा. शाळा, सिद्धनकेरी), श्रीमती भारती येताळा नागणे (न.पा. कन्या शाळा नं. २, मंगळवेढा), श्रीमती भारती विठ्ठल माने (जि.प. प्रा. शाळा, शिरसी), श्री. नंदू रामा डांगे (जि.प. प्रा. शाळा, जगदाळे मळा), श्री. प्रविण रेवणसिद्ध कोष्टी (जि.प. प्रा. शाळा, अकोले), श्री. शिवाजी सुखदेव पोफळे (जि.प. प्रा. शाळा, गुंजेगाव), श्री. दत्तात्रय सत्याप्पा कोळी (जि.प. प्रा. शाळा, मारोळी), श्री. अमीर कादर खतीब (जि.प. प्रा. शाळा, वाघमोडेवाडी) आणि श्री. मच्छिंद्र श्रीपती बनसोडे (विद्यामंदिर हायस्कूल, सलगर) यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.


प्रा. विश्वनाथ ढेपे यांच्या वाणीने सभागृहात हास्यकल्लोळ



कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विश्वनाथ ढेपे यांचे प्रभावी व खुमासदार वक्तृत्व. आपल्या मिश्कील शैलीतून त्यांनी शिक्षकांच्या कार्यातील विविध पैलू उलगडत उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यांच्या विनोदी, मार्मिक आणि ओघवत्या वक्तृत्वाने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. मनोरंजनासोबतच शिक्षकांची सामाजिक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे असलेले अनन्यसाधारण योगदान त्यांनी अधोरेखित केले.प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच घेतले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो तसेच नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळेतच खरी गुणवत्ता आहे असे त्यांनी आवर्जुन सांगितले .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय चेळेकर यांनी केले. त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमंगल बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. शिवाजी दरेकर यांनी केले.


पुरस्कारप्राप्त शिक्षकांमधून श्री. सर्जेराव रुपनर व सौ. भारती नागणे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारामुळे आपल्या कार्याची दखल घेतल्याचे समाधान असून या सन्मानातून भविष्यात आणखी जोमाने शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


शैक्षणिक सुविधांसाठी सहकार्याचे आश्वासन


यावेळी नगराध्यक्षा सौ. सुनंदा (आबी) आवताडे, पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली ताड आणि नगरपालिका शिक्षण समितीचे सभापती श्री. सोमनाथ आवताडे यांनी पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळांच्या भौतिक सुविधांशी संबंधित प्रश्न व अडचणी निदर्शनास आणून दिल्यास त्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


‘शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा घटक नसून समाजाच्या भावी पिढीची जडणघडण करणारा शिल्पकार आहे. अशा शिल्पकारांचा सन्मान म्हणजे शिक्षणव्यवस्थेचा सन्मान होय,’ असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.


लोकमंगल को-ऑप. बँक, शाखा मंगळवेढा यांच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी विशेष कौतुक केले. शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


यावेळी मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस श्री. संभाजी तानगावडे, सरचिटणीस श्री. राजेंद्र केदार, कार्याध्यक्ष श्री. नागेश धनवे, श्री संत दामाजी शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन श्री. भीमाशंकर तोडकरी, श्री. शिवाजी गणपाटील, श्री. रावजी कांबळे, सचिव श्री. मोहन लेंडवे, श्री. निवास माळी, श्री. गुंडोपंत घाडगे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.

test banner