गौरी-गणपती उत्सवात निर्माल्य संकलनासाठी संजीवनी फाऊंडेशनचा पुढाकार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

गौरी-गणपती उत्सवात निर्माल्य संकलनासाठी संजीवनी फाऊंडेशनचा पुढाकार

 


मंगळवेढा प्रतिनिधी :

 गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलप्रदूषण रोखण्यासाठी संजीवनी फाऊंडेशन, मंगळवेढा यांच्या वतीने निर्माल्य संकलनाची मोहीम राबविण्यात येणार आहे. देवाला अर्पण करण्यात येणारी फुले, हार तसेच इतर निर्माल्य नदी, ओढे किंवा जलस्रोतांमध्ये टाकू नये, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने मंगळवेढेकर नागरिक तसेच गणेश मंडळांना करण्यात आले आहे.


उत्सवादरम्यान जमा होणारे निर्माल्य स्वतंत्र निर्माल्य संकलन बॉक्समध्ये जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, संजीवनी फाऊंडेशनच्या माध्यमातून हे निर्माल्य संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट किंवा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


गौरी-गणपती उत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असला तरी त्यासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे गरजेचे आहे. निर्माल्य नदीत किंवा जलस्रोतांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘निर्माल्य नदीत टाकू नका, जलप्रदूषण करू नका’ असा संदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येत आहे.


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मंगळवेढ्यातील सर्व गणेश मंडळे, नागरिक आणि भक्तांनी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन संजीवनी फाऊंडेशन, मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘स्वच्छ मंगळवेढा • हरित मंगळवेढा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


— संजीवनी फाऊंडेशन, मंगळवेढा

test banner