गोपाळपूरच्या श्रीकृष्ण मंदिरातील तटबंदीचा शिलालेख उजेडात रवि मोरे यांचे संशोधन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

गोपाळपूरच्या श्रीकृष्ण मंदिरातील तटबंदीचा शिलालेख उजेडात रवि मोरे यांचे संशोधन.


मंगळवेढा:- 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या मागील तटबंदीवर कोरलेला शके १८३३ (इ.स. १९११) मधील एक महत्त्वपूर्ण शिलालेख प्रकाशात आला असून, तो तत्कालीन देवस्थानांच्या आर्थिक नियोजन,मंदिर व्यवस्थापन आणि सामाजिक सहभागाचा दुर्मिळ ऐतिहासिक पुरावा ठरत आहे. 


देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील हा आठ ओळींचा शिलालेख मंदिराच्या मागील तटबंदीच्या बाहेरील भिंतीवर कोरलेला आहे.अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस आणि रंगरंगोटीचा परिणाम झाल्याने काही अक्षरे अस्पष्ट झाली असली तरी त्याचे वाचन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे.


शिलालेखाच्या सुरुवातीला "श्री गोपाळकृष्ण प्रसन्न" असा मंगलाचरणाचा उल्लेख असून, त्यानंतर मंदिराच्या पाठीमागील तटबंदीच्या बांधकामाची माहिती दिली आहे.श्री जनाबाई यांच्या नावाने मिळणाऱ्या निधीतून तसेच देवस्थानाच्या उत्पन्नातून प्रथम नियमित देवस्थान खर्च भागविण्यात आला. त्यानंतर उर्वरित निधीतून तटबंदीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले,अशी स्पष्ट नोंद या लेखात आहे. 


विशेष म्हणजे हे कार्य समस्त गुरव समाजाने पूर्ण केले असून त्यासाठी २५०० रुपये खर्च झाल्याची नोंदही कोरण्यात आली आहे.


इतिहास अभ्यासकांच्या मते, हा शिलालेख केवळ मंदिराच्या बांधकामाची नोंद नसून तत्कालीन देवस्थानांची आर्थिक शिस्त,निधी नियोजन आणि धार्मिक संस्थांच्या संघटित व्यवस्थापनाची साक्ष देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.


देवस्थानाच्या उत्पन्नाचा नियोजनबद्ध वापर केला जात होता, तसेच मंदिर व्यवस्थापनात गुरव समाजाची सामूहिक भूमिका होती, हे या लेखावरून स्पष्ट होते.


या शिलालेखातील २५०० रुपयांच्या खर्चाची नोंद त्या काळातील आर्थिक परिस्थिती, बांधकाम खर्च आणि देवस्थानांच्या आर्थिक क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते. 


तसेच श्री जनाबाई यांच्या उल्लेखामुळे त्या व्यक्तीचे मंदिराशी असलेले संबंध, दानपरंपरा आणि स्थानिक धार्मिक इतिहासाचा पुढील अभ्यास करण्यास नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.


पुराभिलेखशास्त्र, स्थानिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा असून,भविष्यातील संशोधनासाठी तो विश्वासार्ह ऐतिहासिक स्रोत मानला जात आहे.


शिलालेखाचे संशोधक रवी शिवाजी मोरे,शिलालेख वाचन अनिल दुधाणे व कृष्णा गुडदे यासाठी सहकार्य अविनाश डोके पाटील यांचे लाभले.


test banner