कारगिल युद्धातील शहीदांना १६० किमी सायकलिंग मधून अनोखी मानवंदना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २८ जुलै, २०२६

कारगिल युद्धातील शहीदांना १६० किमी सायकलिंग मधून अनोखी मानवंदना.


मंगळवेढा:- 

संपूर्ण भारतात २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा होत असताना मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या काही सदस्यांनी मात्र मंगळवेढा ते हत्तरसंग कुडल संगम १६० किमी सायकलिंग करून युद्धातील शहीदांना मंगळवेढेकरांच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली.


सन १९९९ मध्ये हिमालयातील अतिशय खडतर भागात झालेल्या कारगिल युद्धात ५२७ वीर जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले असुन अशा जवानांना खडतर मार्गानेच सायकलिंगचा प्रवास करून त्यांच्या अदम्य शौर्याला,त्यागाला सलाम करण्यासाठी सदर राईडचे आयोजन करण्यात आले होते.


विशेष बाब म्हणजे हत्तरसंग कुडल येथील भिमा आणि सीना नदीच्या संगमावरती जाऊन तिरंगा ध्वज फडकावून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.


यावेळी समाजात राष्ट्रप्रेम,सैनिकांप्रती आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाव वाढावा असा संदेश देण्यात आला.यावेळी सायकलपट्टूच्या हातातील तिरंगा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.


याप्रसंगी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय,वंदे मातरम,इन्कलाब जिंदाबाद,अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषनांनी परिसर दणाणून गेला होता सदर सायकल राईडमध्ये प्रफुल्ल सोमदळे,अविनाश जाधव,विठ्ठल बिले,भारत नागणे,सागर पाटील प्रा विनायक कलुबर्मे यांनी सहभाग नोंदवित सैनिकाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी स्थानिक नागरिक,विदयार्थी भाविक उपस्थित होते.

test banner