मंगळवेढा:-
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रभर कारवाईचा धडाका उठवल्यामुळे मंगळवेढ्यामध्ये त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला.त्यांची किमान तीन वर्षे बदली करू नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
गुटखा विक्री,भेसळयुक्त दुध,अन्नपदार्थ आणि बनावट औषधांवर धडक कारवाई करून मुंढे यांनी माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
आपल्या धाडसी व प्रामाणिक कार्यशैलीमुळे राज्यभर ओळख निर्माण करणाऱ्या मुंढे साहेबांमुळे मंगळवेढा परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेले भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री,अवैध धंदे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रवृत्ती यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची मागणी आहे.
प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी जर निर्भयपणे काम करत असतील, तर समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे या विचारातून हा अभिषेक करण्यात आला.त्यांनी जनतेसाठी समर्पित सेवा,पारदर्शक कारभार,भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई या मूल्यांचे सातत्याने पालन केले असून,अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने एकजूट दाखवणे ही काळाची गरज असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे.
या आंदोलनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिक,युवक,शेतकरी,व्यापारी, महिला,सामाजिक कार्यकर्ते,माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
चौकट:-
खुर्चीचा मान पदामुळे मिळतो,पण जनतेचा मान सेवेमुळे मिळतो. शासनाचा पगार हा फक्त घर चालवण्यासाठी नसून जनतेची कामे प्रामाणिकपणे पार पाडल्याबद्दल मिळणारी लोकसेवेची पावती आहे.
तुकाराम मुंडे सारखा अधिकारी प्रामाणिक काम करत असेल तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
सतीश दत्तू- अध्यक्ष वारी परिवार मंगळवेढा.
