शिवाजी विद्यापीठ व ॲग्रीकॉस एक्सपोर्टस सामंजस्य कराराने कृषीउद्योग - शिक्षण क्षेत्रात नवे पर्व. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

शिवाजी विद्यापीठ व ॲग्रीकॉस एक्सपोर्टस सामंजस्य कराराने कृषीउद्योग - शिक्षण क्षेत्रात नवे पर्व.



मंगळवेढा | प्रतिनिधी:-

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उद्योग-शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला.जैवतंत्रज्ञान विभागाच्या पुढाकारातून विद्यापीठ आणि ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात हा करार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी प्रत्यक्ष जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


​हा करार प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ​या करारामुळे केवळ कागदोपत्री सहकार्य न राहता, प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 


या करारामुळे विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल. विद्यापीठातील संशोधक आणि कंपन्यांचे तज्ज्ञ मिळून नव्या उत्पादनांवर संशोधन करतील. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकेल. 


माजी विद्यार्थी आपल्या अनुभवातून सध्याच्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देतील.या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि निर्यात प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळणार आहे. कृषी व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.


कार्यक्रमावेळी ॲग्रीकॉस एक्सपोर्टसचे सी.ई.ओ. श्री. अजय आदाटे यांनी जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांची वाढती मागणी व निर्यात क्षेत्रातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 


विद्यापीठ प्रशासनाने हा करार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.


या सामंजस्य करारामुळे उद्योग व शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत होऊन संशोधनाधारित शिक्षणाला चालना मिळेल,तसेच ग्रामीण व कृषी क्षेत्रातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


'शिका आणि कमवा' यासोबतच 'शिकतानाच उद्योजक व्हा' या संकल्पनेला यामुळे बळ मिळणार आहे. या करारामुळे शिवाजी विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र न राहता, उद्योजक घडवणारे केंद्र म्हणून समोर येत आहे.


या करारावेळी प्रास्ताविक डॉ. सुषमा पाटील यांनी तर आभार डॉ.दीप्ती कुऱ्हे यांनी मानले.


-------------------------------------------- 


​"विद्यापीठाच्या इतिहासात माजी विद्यार्थ्यांसोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर करार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याच विद्यार्थ्यांनी घडवलेल्या उद्योगांसोबत काम करणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

 - डॉ ज्योती जाधव, प्रभारी प्र. कुलगुरू शिवाजी विद्यापीठ.

test banner