मंगळवेढा, दि. १२ (प्रतिनिधी) :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (५० वे वर्ष) कृषिविषयक महा चर्चासत्र २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ, शिवप्रेमी चौक, आठवडा बाजार, मंगळवेढा येथे हा दोन दिवसांचा कृषी महोत्सव संपन्न होत आहे.
सध्या बदलते हवामान, वाढते उत्पादन खर्च, पाणीटंचाई व रोग-कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर डाळिंब, आंबा आणि ऊस या प्रमुख पिकांवरील आधुनिक लागवड तंत्र, पाणी व अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या उपाययोजना तसेच शाश्वत शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दि. १२ फेब्रुवारी रोजी "डाळिंब–आंबा महा चर्चासत्र" आयोजित करण्यात आले असून, डाळिंब लागवड व बहार व्यवस्थापन, तेलकट व मर रोग नियंत्रण, कीड व्यवस्थापन, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
आंबा पिकामध्ये लागवड पद्धती, मोहोर व्यवस्थापन, भुरी व खोड रोग नियंत्रण तसेच उत्पादन व दर्जा वाढविण्याच्या आधुनिक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या चर्चासत्रात अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष श्री.प्रभाकर चांदणसो,राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती मनीषा मिसाळ, एम.एस्सी. बायोटेक अजय आदाटे, डाळिंब मार्गदर्शक श्री. अक्षय सागर, प्रगतशील डाळिंब बागायतदार श्री. भाऊसाहेब जाधव तसेच आंबा बागायतदार श्री. सचिन कुलकर्णी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दि. १३ फेब्रुवारी रोजी "ऊस पीक महा चर्चासत्र व ऊस जाती प्रदर्शन" होणार आहे. २०२५-२६ हंगामात उत्पादन वाढविण्यासाठी खोडवा व सुरु ऊस व्यवस्थापन, रोप लागवड पद्धती, अंतरखतपाणी, रोग व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता टिकविणे तसेच नवीन एआय (AI) ऊस तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे, यावर सखोल चर्चा होणार आहे. याच दिवशी विविध ऊस जातींचे प्रत्यक्ष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना योग्य जाती निवडीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
या कृषी महोत्सवाचे उद्घाटन मा. आ. अभिजीत धनंजय पाटील (चेअरमन, विठ्ठल शुगर, वेणनगर) व मा. श्री. संजय महादेव आवताडे (चेअरमन, आवताडे शुगर, नंदूर) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे (चेअरमन, सीताराम महाराज साखर कारखाना, खर्डी) राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. श्री. उमेश परिचारक (चेअरमन, युटोपियन शुगर, कव्हेवाडी), मा. श्री. शिवानंद पाटील (चेअरमन, दामाजी सह. साखर कारखाना, मंगळवेढा), मा. श्री. अनिल सावंत (चेअरमन, भैरवनाथ उद्योग समूह) तसेच मा. श्री. सचिन जाधव (चेअरमन, जकाराया शुगर, वटवटे) यांची उपस्थिती लाभणार आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने केवळ उत्सव न साजरा करता शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्ञानवाटपाचा उपक्रम राबविणे ही एक सामाजिक जबाबदारी असल्याचे आयोजकांनी सांगितले. या दोन दिवसांच्या कृषी महा चर्चासत्राचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त डाळिंब, आंबा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा यांनी केले आहे.
