मंगळवेढा:-
थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा नगरीत विजयादशमीच्या औचित्याने सर्वधर्मीय एकता रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला साजेशी ही रॅली ठरली.शिवालय शिवप्रेमी चौकातून रॅलीला सुरुवात होऊन दामाजी चौक, चोखामेळा चौक मार्गे रॅली पुढे सरकली.
महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापाशी या रॅलीचा समारोप झाला.शहरातील सर्व जाती-धर्माचे नागरिक, युवक-युवती,माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच समस्त मंगळवेढेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम बांधवांसह विविध समाजघटकांच्या सहभागामुळे मंगळवेढ्याच्या एकतेचा संदेश राज्यभरात पोहोचला.शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेली,जातीभेद, अंधश्रद्धा व व्यसनापासून मुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प यातून दृढ करण्यात आला.
कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी भाषणातून आपले विचार मांडले.“सध्या महाराष्ट्रात जाती-धर्मातील मतभेद वाढत आहेत हे विसरून एकसंध महाराष्ट्र घडविण्याची गरज आहे.
सामाजिक एकोपा व तरुणाईच्या सकारात्मक सहभागातूनच महाराष्ट्राची खरी ताकद वाढेल,”असे मत व्यक्त करण्यात आले.
विजयादशमीसारख्या सणाच्या दिवशी एकतेचा संदेश देणारी ही रॅली मंगळवेढ्यात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा वारसा अधिक दृढ करणारी ठरली.