महानायक - नेताजी सुभाषचंद्र बोस. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

महानायक - नेताजी सुभाषचंद्र बोस.


               

                     'तुम मुझे खून दो मे तुम्हे आझादी देता हूं', असे म्हणत भारतीय स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना प्रेरित करणारे थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 127 वी जयंती अश्या थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन!.


                    अंगी प्रचंड देशभक्ती आणि ब्रिटिश सरकारला देशाबाहेर खदेडून ही भारतभूमी स्वतंत्र करण्याची महत्वाकांक्षा, यातूनच 1920 साली नेताजींनी त्याकाळी सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या नागरी सेवेतील इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेचा उत्तीर्ण म्हणून आलेला निकाल भेळ खाल्लेला कागद केराच्या टोपलीत फेकावा तसा फेकून दिला आणि काँग्रेसच्या सुरू असलेल्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये उडी घेतली.एक दोन नव्हे तर तब्बल 19 वर्ष नेताजींनी काँग्रेस मध्ये काम केले, दरम्यानच्या काळात 1938 आणि 1939 अशी सलग दोन वर्षे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव नेते म्हणूनही नेताजी सुभाषचंद्र बोस ओळखले जातात. 


                        तत्पूर्वी ऑल इंडिया युथ काँग्रेस चे अध्यक्ष, बंगाल काँग्रेस चे अध्यक्ष ही महत्वपूर्ण पदेही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली परंतु आता ब्रिटिशांना लढा देण्यासाठी एखाद्या डीरेक्ट ऍक्शन प्लॅनची गरज म्हणून जागतिक महायुद्धातील ब्रिटिश विरोधी आणि फॅसिस्ट विचारधारा असणाऱ्या जर्मनी,जपान सारख्या राष्ट्रांची मदत घेण्याचा आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेला त्यांचा विचारच त्यांना काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यापर्यंत घेऊन गेला. 

                       त्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाच्या स्थापनेबरोबर सुरू झाले एक धगधगते अग्निकुंड. 1940 साली इंग्रजांच्या स्थानबद्धतेतून आणि नजरकैदेतून निसटत गुप्तपणे ओळख लपवत यशस्वीरीत्या अफगाणिस्थानमार्गे रशिया, जर्मनी, जपान ह्या ब्रिटिशविरोधी गटातील देशांमध्ये जाऊन तेथील राज्यकर्त्यांकडून लष्करी मदत घेऊन हिंदुस्थानला स्वतंत्र करण्याचा नेताजींचा मनसुबा हा साधासोपा नव्हता. नेताजींनी जरी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना करून काँग्रेस पक्षाशी फारकत घेतली असली किंवा गांधीजींशी त्यांचे काही वैचारिक मतभेद असले तरी मनभेद मात्र कधीही नव्हते,जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आणि देशभरातील सर्व जातीधर्मातील सैनिकांनी तयार झालेल्या आझाद हिंद सेनेची सूत्रे हाती घेऊन त्याचवेळी आझादहिंद सेनेतील सैन्यतुकड्यांना त्यांनी गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, मौलाना आझाद ब्रिगेड ही नावे दिलेली होती.

                 त्याचबरोबर पुढे 1945 साली बर्मा येथून आझाद रेडिओ वरून महात्मा गांधींचा 'राष्ट्रपिता' असा केलेला उल्लेख, यावरूनच हे सिद्ध होते. 'चलो दिल्ली' च्या नाऱ्यासह अंदमान-निकोबार, ईशान्य भारतातील कोहिमा,इंफाळ ह्या भागात आझाद हिंद सेना आणि मदतीला असलेले जपानी सैन्य ब्रिटिश लष्कराशी दोन हात करू लागले. परंतु प्रचंड पावसामुळे नद्यांना आलेले पूर, अन्नधान्याची टंचाई, इंग्रजी लष्कराच्या हवाई माऱ्यापुढे आझाद हिंद सेना फार काळ तग धरू शकली नाही. एका बाजूला जागतिक पातळीवर महायुद्धात जर्मनी जपानसारख्या शत्रू राष्ट्रांना जेरीस आणत जिंकत असणारे इंग्रज आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या सीमावर्ती भागात विविध कारणांनी होत असणारी आझाद हिंद सेनेची वाताहत,ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नेताजींनी उर्वरित सैन्याला भारतात गेल्यावर म. गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा संदेश दिला. ह्याच दरम्यान 18 ऑगस्ट 1945 रोजी तायपै येथे एक हवाई दुर्घटनेत नेताजी सुभाषचंद्र बोस नावाच्या ह्या वादळाचा देश स्वतंत्र होण्याअगोदरच अंत झाला. 

                  नेताजींचे अगदी मृत्युपर्यंतचे सबंध जीवनच गुंतागुंतीचे, संघर्षमयी आणि गूढ होते , त्यांच्या मृत्यूच्या पश्चात आझाद हिंद सेनेच्या अधिकारी आणि सैन्यावर इंग्रजांनी भरलेल्या देशद्रोहाच्या खटल्याविरुद्ध लढण्यासाठी स्वतः पंडित नेहरू  ,बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू, बॅरिस्टर भुलाभाई देसाई ह्या काँग्रेसच्या दिग्गजांनी असहकार आंदोलनावेळी त्यागलेले वकिलीचे काळे कोट अंगावर चढवले होते. जनरेट्यापुढे शेवटी ब्रिटिशांनाही आझाद हिंद फौजेवरचे खटले माघारी घ्यावे लागले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमधले निर्विवाद पणे सर्वात मोठे क्रांतिकारक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन .

- आदित्य जाधव, सोलापूर.



test banner