अविस्मरणीय वावरातली हुरडा पार्टी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

अविस्मरणीय वावरातली हुरडा पार्टी.



राज्यभर थंडीमुळे शेकोट्या पेटत असताना २१ जानेवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात, मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव या ठिकाणी हुरडा पार्टीचा फक्कड बेत संपन्न झाला. गुंजेगावात प्रवेश करताच सुनील चौगुले साहेबांच्या दुकानात दहा मिनिटे बसून तिथून आमची स्वारी चौगुले साहेबांच्या घरी रवाना झाली. 

चहापानाचा कार्यक्रम उरकून आम्ही थेट शेतात गेलो. हुरडा पार्टी अर्थात निसर्गाच्या सानिध्यात आंब्याच्या झाडाच्या गर्द सावलीत कोवळ्या ज्वारीची, मकेची कणसे आरावर भाजून त्याचा गरम गरम आस्वाद घेताना सोबत भाजलेले शेंगदाणे, गूळ, काळी चटणी, शेंगदाणा चटणी असा रानमेवा खाताना एक वेगळाच आनंद येत होता.सोबतच कुटुंबीय व मित्रजनांची साथ संगत यामुळे चौगुले साहेबांच्या या सुप्रसिद्ध हुरड्याची चव कोणत्याही पक्वान्नांना भारी पडते. 


या रानमेव्याचा आस्वाद घेऊन तिथे आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला. क्रिकेट ,आंधळी कोशिंबीर, बॅडमिंटन, तळ्यात मळ्यात या सर्व खेळांचा लहान मोठ्यांनी मनमुराद आनंद लुटला. तिथून आम्ही जेवणाच्या ठिकाणी गेलो आणि गेल्या गेल्या पंगतीलाच बसलो आणि काय ते जेवण... विषय हार्ड... तीळ लावलेली बाजरीची भाकरी, चपाती,पालकपुरी, मटकीची उसळ, लोणचं, वांग्याची भाजी, खरडा, दही, जवसाची चटणी, जीरा राईस , मसाला राईस, मोदकाची आमटी मला वाटलं एवढ्यावर थांबतय की काय पण कुठलं... शेवटी गुलाब जामुन अजून होतच, मग काय सगळ्यांनी जाम ताव मारला आणि जेवणाचा शेवट गोड केला. या सगळ्या हुरडा  पार्टीत अजय आदाटे साहेबांनी काढलेले फोटो म्हणजे जणू एक पर्वणीच, फोटोला तोडच नाही,... 

पुनश्च एकदा चौगुले साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद ! 

सूर्य मावळतीकडे झुकला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला...

अशाप्रकारे हुरडा पार्टीचा बेत अवर्णनीय झाला.


या निमित्ताने दोन कवितेच्या ओळी आठवतात,

         

जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत              आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी                संगत.. 

आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत जाते !!!


- शशिल ढोले - पाटील सर 

(विद्यामंदिर शाळा, सांगोला).




test banner