केशरी कार्डधारकांना मेपासून धान्य मिळणार-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

केशरी कार्डधारकांना मेपासून धान्य मिळणार-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

         
 सोलापूर(विशेष प्रतिनिधी ) जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांनाही रेशनवर धान्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कार्डधारक लाभार्थ्यांची माहिती शासनाला कळविली आहे. मेपर्यंत या लोकांसाठी धान्य उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी (एपीएल) आवश्यक धान्य वाटपाबाबत शासनाला माहिती कळविली आहे. केशरी कार्डधारकांची संख्या 3 लाख 75 हजार 152 एवढी आहे. त्यामध्ये 8 लाख 79 हजार 363 लाभार्थी आहेत. तर त्यांच्यासाठी प्रतिमाणसी 3 किलो गहू याप्रमाणे 26,380.89 क्‍विंटल गहू लागणार आहे. तर प्रतिलाभार्थी 2 किलो तांदूळ याप्रमाणे 17,587.26 क्‍विंटल तांदूळ लागणार आहेत. त्यानुसार गव्हासाठी 7,08,02,088 रुपये एवढा निधी आवश्यक असणार आहे, तर तांदळासाठी 6,55,43,497 एवढा निधी आवश्यक असेल.

त्यामुळे केशरी कार्डधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा प्रशासनावर सुमारे 13 कोटी 63 लाख 45 हजार 585 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त भार पडणार आहे.

संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार तांदळाचे मोफत वितरण करणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करुन तांदूळ उपलब्ध करुन घेतला. त्याचे वितरण करण्यास 10 एप्रिलपासून सुरुवात केली. दोन दिवसांत 4 हजार 737 क्विंटल तांदळाचे वितरण झाले.

दरम्यान, एप्रिल महिन्यातील अंत्योदय अन्न योजनेतून 18612 क्विंटल गहू आणि तांदूळ वितरण केला आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतून 95283 क्विंटल गहू, तांदूळ आतापर्यंत वितरित केले आहे. मे व जून महिन्यासाठी वरील दोन योजनेतून गहू आणि तांदळाच्या वितरणासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय खाद्य महामंडळाकडे पैसे भरले असून त्याची उचल 15 एप्रिलपासून सुरू होईल. मे आणि जून महिन्यातही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मोफत तांदळाचे वितरण होणार आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.

केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) मे आणि जून महिन्यासाठी प्रति सदस्य दरमहा पाच किलो धान्य दिले जाणार आहे. यामध्ये 8 रुपये दराने 3 किलो गहू आणि 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ दिला जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेले शहरी भागातील कमाल 59 हजार ते 1 लाख रुपये आणि ग्रामीण भागातील कमाल 44 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारे कुटुंब यास पात्र ठरविण्यात येणार आहे.

test banner