मंगळवेढा (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे.पूर्वी राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, मध्यंतरी दोन-तीन बैठकांना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हजेरी लावली होती. या बैठकांदरम्यान त्यांनी आपल्या अनुभवाची आणि कार्यकौशल्याची चुणूक दाखवून दिली. विधिमंडळाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या बैठकीत दिसून आला. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर वळसे-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याकडे काहीअंशी दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिक प्रसारमाध्यमांतून व्यक्त करण्यात आली होती.
सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी याबाबतीत पक्ष नेतृत्वाकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळसे-पाटील यांच्याविषयी तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू मंत्री असणार्या दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून ती पुन्हा शरद पवार यांचेच खंदे समर्थक असणारे मुंबई आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर या निर्णयाविषयी उलटसुलट चर्चा सुरु होती. वळसे-पाटील यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्याकडील सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी काढून ती आव्हाड यांच्याकडे देण्यामागे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय, हे अनेकांच्या लक्षात आले नाही.