मुंबई(विशेष प्रतिनिधी ) राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा मुद्दा ताणला गेला आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांकडून भाजप नेतृत्त्वाची सध्याची चाल पाहता युती तुटणार अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, २६ सप्टेंबरला अमित शहा पुन्हा एकदा मुंबईत येणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यावेळी शिवसेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
मात्र, अमित शहा मुंबईत येण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
या दोन दिवसांमध्ये दोन्ही पक्ष जागावाटपाच्या सूत्रावर राजी होतील, असा कोणता चमत्कार घडेल, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन दिवसांत शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नुकत्याच नाशिक आणि मुंबई येथे झालेल्या सभांमध्ये युतीचा साधा उल्लेखही केला नव्हता. याउलट मुंबईतील सभेत 'कुछ भी हो या कुछ भी ना हो, हमारी जीत पक्की है,' असे विधान करत अमित शहा यांनी वेळ पडल्यास भाजप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही ऐनवेळी युती तुटणार, असा अनेकांचा कयास आहे.
सध्याच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येत नसल्यामुळे भाजपही अडून बसला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पही रद्द केला होता. त्यामुळे आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे.
त्यानुसार भाजपकडून १०५- १६५ असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण माघार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.