मंगळवेढा:-
शालेय विद्यार्थ्यांना स्टिंगसारख्या उत्तेजक पेयापासून दूर ठेवण्याची मागणी वारी परिवाराच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी कार्यालयात दर्शन मेहता यांनी स्वीकारले.
यावेळी अजिंक्य भालेकर ,यश दत्तू,अविराज जाधव,सुदर्शन ढगे,स्वप्नील टेकाळे,प्रफुल्ल सोमदळे,विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टिंग तसेच तत्सम उत्तेजक असलेले पेय पिण्याची एक सवय दिसून येत आहे.अशा पेयाचे दूरगामी परिणाम मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरती दिसून येतात.
त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून या मुलांना त्यापासून दूर ठेवण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्यही या द्रव्याच्या सेवनामुळे धोक्यात येत आहे.
त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र देऊन याबाबत अवगत करावे.त्याचबरोबर प्रत्येक शाळांनी मुले हे पेय विकत घेणार नाहीत,तसेच पिणार नाहीत,याची काळजी घेण्याबाबत आपण त्यांना आदेशित करावे,अशी मागणी केली आहे.
‘स्टिंग’ या पेयाच्या बाटलीवर हे पेय मुलांसाठी,गरोदर मातांसाठी तसेच ज्या व्यक्तींना कॅफिन या उत्तेजक द्रव्याची अॅलर्जी आहे, अशांसाठी ‘नाही’ असे स्पष्ट लिहिलेले आहे.
तसेच हे पेय कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी दिवसातून 500 मिलीपेक्षा जास्त प्रमाणात घेऊ नये असेही स्पष्ट लिहिलेले आहे. तरीही असे निदर्शनास येते की,शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे पेय प्रिय आहे.
ही मुले दिवसातून मोठ्या प्रमाणात हे पेय पिताना दिसून येतात.ही बाब गंभीर चिंतेची आहे.असे निवेदनात नमूद केले आहे.