मंगळवेढा:-
शिवतेजाचा गगणी चमकला ऐसा एकच तारा तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा यातून संभाजी राजांच्या शौर्याची गाथा शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी कथिली ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती सुवर्ण महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या शाहिरी बाणा या कार्यक्रमातून पोवाडा सादर करीत बोलत होते.
सुरवातीस छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन माजी अध्यक्ष रामचंद्र वाकडे,खंडू खंदारे,ऍड.बापूसाहेब मेटकरी,माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कांबळे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतल्यानंतर प्रत्येक मराठी माणसात विरश्री संचारते असे सांगून आधी नमन साधू-संताला, नामदेवाला तुकारामाला,राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या गुरुचरणाला या कवनाने पोवाड्याला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी बोकाळलेला यवनी सत्तेचा जुलूम पाहून जिजामातेच्या मनातील घालमेल त्यांनी सादर करून छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे हुंकार असल्याचे सांगून शंभू महाराजांचा जीवनपट पोवाड्याच्या सादरीकरणाने उलगडून दाखविला सदा विजयी,सदा निर्भीड छावा आमुच्या शिवबाचा मागे न फिरला पुरून उरला निधड्या छातीचा अशी अनेक शंभूगिते सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी सर्व आजी-माजी अध्यक्ष,सार्वजनिक शिवजयंती सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व सदस्य,शिव शंभू भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन माजी अध्यक्ष प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.