मंगळवेढा:-
एचपीसीएल सोलापूर एलपीजी प्रादेशिक कार्यालय सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरात आयोजित केलेल्या सक्षम सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबने सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाचा नारा दिला.
सदर रॅलीचे उदघाटन होम मैदानावर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते व एलपीजीचे आरएम नितीन शहारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर सायकल रॅलीतून आज सायकल चालवणे,कामावर तसेच नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करावा,जवळपासच्या कमी अंतरासाठी वाहतुकीचे एक बिगर-यंत्रीकृत साधन म्हणून सायकल चालवणे,पेट्रोलियम उत्पादनांची बचत करणे यामुळे केवळ इंधनाची बचत होत नाही तर आपले आरोग्य चांगले,निरोगी आणि तंदुरुस्त राहते तसेच पर्यावरण आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाबाबत समाजातील विविध गटांना जागरूक करणे व पर्यावरण रक्षणाची जनजागृती करणे अशा अनेक विषयाबाबत सोलापूर शहरातील प्रमुख मार्गांवर प्रबोधन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सोलापूर जिल्ह्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने व एलपीजीचे आरएम नितीन शहारे यांनी वारी परिवार सायकल क्लबच्या विविध उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यावेळी पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे एकसारखे पांढरे टीशर्ट व टोपी विशेष लक्ष वेधून घेत होते.यावेळी वारी परिवार सायकल क्लबचे पांडुरंग नागणे,शरद हेंबाडे,चंद्रकांत चेळेकर,प्रफुल्ल सोमदळे,सिद्धेश्वर डोंगरे राहुल बनसोडे,पवन टेकाळे,भारत नागणे,विष्णू भोसले,स्वप्निल टेकाळे,प्रकाश मुळीक,गणेश मोरे,यश महामुनी,प्रणव हेंबाडे,रोहन सूर्यवंशी,आदित्य कारंडे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तु यांचेसह 1000 सायकल स्वार सहभागी होते रॅलीसाठी पी.बी.पाटील पेट्रोलियम मंगळवेढा यांचे विशेष सहकार्य लाभले.