शेतकऱ्यांच्या हक्काचा सण म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

शेतकऱ्यांच्या हक्काचा सण म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा.


मंगळवेढा: 

आज (30 डिसेंबर 2024) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात.हा सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.


आपल्या मंगळवेढा मध्ये सध्या रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा,कापणीसाठी आलेली तूर, फुले लागून परिपक्व होऊ लागलेला हरभरा,हवेच्या तालावर नाचणारा गहू,पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग असतो.असे एकंदरीत वातावरण दिसत आहे. 


आपला भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.कृषीशी संबंधित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात.असाच एक सण म्हणजेवेळ अमावास्या आज (30 डिसेंबर 2024) वेळ अमावास्या आहे.याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. 


हा सण सोलापूर आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात जेवणाचा आनंद लुटतात.  


शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा. ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी शिवार गर्दीने फुलून गेले असतात. प्रत्येक शेतात घरातील लोक,पै पाहुणे, मित्रमंडळी यांच्यामुळे सगळे शिवार माणसाने फुलून जातात.


वेळ अमावस्या...

आज मार्गशीर्ष अमावस्या ही म्हणजे वेळा अमावस्या. मुळात अमावस्या म्हणले की एक भिती असते, पण दिवाळी आणि आजची अमावस्या हे सण आनंददायी सण म्हणून साजऱ्या होणाऱ्या अमावस्या मानल्या जातात. 


आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळा अमावस्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसे पाहायला गेले तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रमध्ये बहुतेक हा सण साजरा केला जात नाही.


वेळ आमावश्येला आजच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी दिली जाते.उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणून हिवाळा मानला जातो. आयुर्वेदानुसार,हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. 


त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते.या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. 


त्यामुळे या दिवसांत दूध,तूप,दहीस,लोणी यांचा आहारात समावेश करावा.यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते.त्य़ामुळे दूरवरून लोकं लातूरमध्ये वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी येत असतात.


वेळ आमावश्या एक परंपरा : 

शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावीत,शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध,फुले, धूप,नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे.असाही एक रिवाज चालत आलेला आहे. 


संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभऱ्याच्या वावराला ओवाळून काढायची प्रथा आहे. त्यानंतर तो टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा.मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायची परंपरा आहे.



रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते


2024 या वर्षातील आजची शेवटची अमावास्या आहे. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते.गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात.तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटतात. 


आज शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू,हरबरा,ज्वारी,करडई,सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. 


मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात सोलापूर आणि मराठवाडा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. 


वेळ अमावस्येला प्रामुख्याने कोणते पदार्थ तयार करतात?


हा सण सोलापूर आणि मराठवाड्यात काही भागात साजरा केला जातो.दरवर्षी या सणाची घराघरात जय्यत तयारी सुरु असते.तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा.हरभरे पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात शिजवलेली भज्जी.


वेळ अमावस्येला डाळीच्या पिठात विविध भाज्यांची मिसळ करुन तयार केलेली भज्जी हा मानाचा पदार्थ असतो.भज्जीसाठी हिरवी मटार,हरभरा,वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगातील हिरवे दाणे,काकडी किंवा वाळूक, वांगी,मेथीचा पाला,कोथिंबीर,कांदापात,लसुणपात, आले,शेंगदाणे,हिरवी चिंच,गाजराचा वापर केला जातो. 


ज्वारी भरड्याचा आंबड भात,तांदळाची खीर,भात, ज्वारी अन् बाजरीचे उंडे,ज्वारी,बाजारीची भाकरी, तुरीचे फिके वरण या शिवाय बरेच जण धपाटे, तिळाच्या पोळ्याही करतात.


वेळ अमावस्येचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे आंबील.चार-पाच दिवसांच्या आंबट दह्याचे ताक केले जाते.त्यात थोडेचे ज्वारी पीठ शिजवून टाकले जाते. मीठ, जिरेपूड,कोथिंबीर,आले,लसणाचे वाटण अन् मिरची पावडर त्यात कच्चेच टाकतात.ती नव्या मडक्यात ठेवतात.तत्पूर्वी मडके काव-चुन्याने रंगवले जाते.


20 ते 25 लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावर घेऊन शेतात जातात. तिथे शेताची पूजा केली जाते. त्यानंतर सर्वजण जेवण करतात.


अजय आदाटे(कार्यकारी संचालक ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा.ली.)


test banner