मंगळवेढा(प्रतिनिधी) मागील दोन गळीत हंगाम बंद राहिलेल्या तालुक्यातील नंदुर येथील फॅबटेक शुगर या कारखान्याचा ताबा आता आवताडे शुगर प्रा. लि. या कंपनीकडे आला. यंदाच्या गळीत हंगामापासून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.
गेली दोन वर्ष कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे बंद होता. बँकेच्या कर्जापोटी या कारखान्यावर बँकेने कर्ज प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. कारखाना हस्तांतरणाची दोन वेळा प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर या कारखान्याचा ताबा आवताडे शुगर प्रा. लि. या कंपनीने मिळवला.कारखान्याची गाळप क्षमता 5 हजार मे. टन गाळप असून 30 मेगावॉटचा कोजन प्रकल्प आहे तर 65 केलपीडीचा डिस्टिलरी प्रकल्प आहे या कारखान्याची क्षमता तालुक्यात सर्वाधिक मोठी आहे कार्यक्षेत्राबरोबर महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर हा कारखाना असल्यामुळे कार्यक्षेत्राबरोबर पंढरपूर,मोहोळ,द.सोलापूर,सांगोला आणि कर्नाटकातील इंडी ऊस देखील सहजरीत्या उपलब्ध होणे शक्य आहे परंतु गेली दोन वर्ष कारखाना बंद राहिल्यामुळे ऊस उत्पादकाची गैरसोय झाली शिवाय कारखान्यात कार्यरत असलेल्या कामगारांना देखील इतरत्र स्थलांतर व्हावे लागले व तर काहींच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली मात्र कारखान्याच्या ताब्याची प्रक्रिया बँकेने पार पाडल्यामुळे आता कारखाना सुरू होण्याचा मार्ग सुरू झाला. त्यामुळे या भागातील बेरोजगार तरुणा बरोबर बंद पडलेले उद्योग व्यवसायिक व्यवसाय सुरू करण्याची देखील संधी मिळणार आहे.पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या कारखान्यावरून आ.समाधान आवताडे यांच्यावर आरोप देखील करण्यात आले होते.तर दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत नुकताच आ. समाधान आवताडे यांच्या गटाचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का पोहोचल्याचे बोलली जात असताना फॅबटेक शुगर हा कारखाना अवताडे परिवारात आल्यामुळे अवताडे गटाच्या मजबुती करणासाठी संधी मिळाली.आज कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने उद्योजक संजय अवताडे यांच्या पत्नी सुकेशनी आवताडे हस्ते सत्यनारायणाची महापूजा करून गाळप हंगाम सुरू करण्याचे दृष्टीने नियोजनास सुरुवात करण्यात आली.