२७ फेब्रु. १९१२! हा ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी ' कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस! त्यांना आमचे कोटी कोटी प्रणाम!
हा दिवस समस्त मराठी जनतेला अभिमानाचा वाटतो. कारण हा 'जागतिक मराठीभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो." आजि सोनियाचा दिनु | वर्षे अमृताचा घनु | " असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांच्या या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखावून जाते कारण मराठीच्या 'म' या अक्षरात 'मी', 'माझी मराठी', 'मायबोली' अशा या सर्व 'म'कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व 'म' सामावलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, " मराठी असे आमुची मायबोली'. इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. त्यांच्याशी आपले नाते 'मावशीचे' - म्हणजे त्यातही परत 'म'चाच आरंभ! मग या भाषा मावशींशीही आपले नाते आहे, ते गोडच असणार व गोडच असले पाहिजे.
जो मराठी द्बेष्टा नाही, जो मराठीचा राग-द्वेष, दुस्वास करत नाही तर उलट ज्यांच्या रोमा-रोमात मराठीची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल असे सर्वजण 'मराठीच' होय. अशा व्यक्तींकडून मराठीचा अपमान कधीच होणार नाही तर उलट मराठीच्या उन्नतीला व प्रसाराला त्यांचा हातभारच लागेल.
अशा या मराठीचे कौतुक काय सांगावे! मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांत गल्लत तर नाही. (असलीच तर ती अत्यल्प). मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म व संवेदनाशील आहे. अशा या संपन्न, परिपूर्ण भाषेचा जगातील ८००० (आठ हजार) भाषांमध्ये १५ वा क्रमांक लागतो.
अशी ही मराठी काळाच्या ओघात टिकून राहिल का? तर या प्रश्नाचे उत्तर 'होय' असेच असेल. सातासमुद्रापलीकडे असलेली पाश्चात्य भाषा आपण शिकतो कारण त्याचे विस्तारित क्षेत्र व सहज साध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो. परंतु पाश्चात्य भाषा आपल्याला शिकावी लागते तर मायबोली आपल्या रक्तात, तनामनात असते ज्यामुळे आपल्या संस्कारांचे पालनपोषण होते आणि आपल्या अस्तित्वाची ती खरी ओळख असते. आणि म्हणूनच अशी ही मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे, मराठीविषयी सुलभ ज्ञान देणे, मराठी भाषेला वैश्विक स्वरुप देणे, समाजाला तिची उपयोगिता पटवून देणे तसेच विविध मराठी साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहोचवणे अशा अनेक गोष्टींनी भाषा टिकून राहते. इतकेच नही तर तिची प्रगती होते. त्यासाठी आपण मात्र प्रयत्नशील असावे.
या प्रयत्नासाठी आपण वचनबद्ध असले पाहिजे व जागतिक मराठी दिवसाच्या निमित्ताने आपण याचा आढावा घेतला पाहिजे व स्वतःच एक मराठी म्हणून तपासून पाहिले पाहिजे की आपण या वर्षी किती प्रगती केली ? घटनेने आपल्याला जो अधिकार दिला आहे त्याचा आपण मान राखून किती वर्चस्व प्रस्थापित केले याचे अवलोकन करणे गरजेचे ठरते.
परंतु एक गोष्ट निश्चित जोपर्यंत आपल्याला आपल्या जन्मभूमी, कर्मभूमीची मनापासून ओढ-प्रेम वाटत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे. जेव्हा आपल्याल कोणी विचारले की " तुम्हाला तुमची भाषा नीट येते का?" याचे उत्तर " थोडी-थोडी येते!" असे आले तर मग तो आपल्याच अस्तित्वाचा अपमान असेल. मग अशावेळी अशा व्यक्तींकडून भाषेचा मान व तीचे अस्तित्व कसे राखले जाणार.
म्हणूनच आपल्याला आपली ओळख व अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर भाषा टिकवणे-जपणे गरजेचे आहे.