राजकारणातील सौभाग्याचा दागिना असणार्‍या सुधाकरपंत परिचारक यांना विजयी करा –शहाजीबापू पाटील. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

राजकारणातील सौभाग्याचा दागिना असणार्‍या सुधाकरपंत परिचारक यांना विजयी करा –शहाजीबापू पाटील.


    मंगळवेढा(प्रतिनिधी ) बदलत्या काळाबरोबर सध्याचे राजकारण हे बदलत चालले असून,राजकारणातील नितीमत्ता,विश्वास,सत्यता,प्रामाणिकपणा,स्वच्छ चारित्र्य,पारदर्शी कारभार या बाबी रसातळाला गेल्या असून ढोंगी,लबाडी,पक्ष बदलू,नितीमत्ता शून्य आणि भ्रष्टाचारी माणसे राजकरणात येत आहेत. राजकारणाच्या गलिच्छ चिखलात पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून आपणांस कमळ फुलवायचे असून, राजकारणातील सौभाग्याचा दागिना असणार्‍या सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पाठविण्यासाठी भरघोस मताने विजयी करा असे आवाहन सांगोला तालुक्याचे माजी आमदार व महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी केले.

   पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित वाखरी ता. पंढरपूर येथील सभेत दिनांक ०६/१०/२०१९ रोजी पाटील बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की,आज या मतदार संघामध्ये अनेक कार्यकर्त्यांना पश्चाताप होत आहे मागील विधानसभा निवडणुकीत आपण चुकीचा उमेदवार पाठविला ज्या उमेदवारला स्वतःचा कारखाना व्यवस्थित चालविता येत नाही, कर्माच्यार्‍यांच्या पगारी वेळेवर देता येत नाहीत त्यांच्या हाती तालुक्याची सूत्रे दिली आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास वीस वर्षे मागे गेला. विरोधी उमेदवार हे केलेल्या विकास कामकाजावर न बोलता केवळ आरोप,व दिशाभूल करून मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे मत श्री.पाटील यांनी व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे स्वागत पांडुरंग सह.सा.कारखान्याचे संचालक व पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे यांनी केले.यावेळी कौठाळी येथील भालके गटाचे मोहन हरी पाटील यांनी आतिशय तळमळीने भाषण करून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचा खरा विकास करावयाचा असेल तर महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून द्यावे असे आवाहन केले.

     यावेळी बोलताना मा.पं.स.सदस्य नाना गोसावी यांनी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक व महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी केलेल्या विकास कामाबद्दल मतदारांना माहिती दिली व या निवडणुकीत वाखरी गाव हे सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयासाठी नेहमीप्रमाणेच अग्रेसर राहील असे मत व्यक्त केले.

     यावेळी रयतक्रांती शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते दीपक भोसले,भा.जा.पा.चे तालुका अध्यक्ष श्रीकांत बागल,पं.स.सदस्या पल्लवी यलमार,कल्याणराव काळे गटाचे मा.उपसरपंच जोतिराम पोरे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पांडुरंग परिवार वाखरी यांचे वतीने सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते वाढदिवसानिमित्त केक कापून व साखर वाटून शुभेच्छा दिल्या.

    प्रचारसभेच्या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते मनोहरभाऊ डोंगरे व मंगळवेढा न.पा.माजी.पक्षनेते अजित जगताप यांनी  वाढदिवसानिमित्त  सुधाकरपंत परिचारक यांना वैयक्तिक शुभेच्छा दिल्या. सदर च्या कार्यक्रमास वसंत नाना देशमुख,दिनकरभाऊ मोरे,दाजी पाटील,दिलीप चव्हाण, प्रणव परिचारक,शिवसेनेचे नेते संभाजी शिंदे,वामनराव माने,गंगारम विभूते,स.शिरोमणीचे संचालक इब्राहीम मुजावर,पंढरपूर ता.पं.स.सभापती राजेंद्र पाटील,प्रभाकर इंगळे,पंडित शेंबडे,यांचेसह वाखरी गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमास उपस्थितांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण पांढरे यांनी केले.

फोटो ओळी: सुधाकरपंत परिचारक यांच्या वाखरी ता.पंढरपूर येथील प्रचार सभेत बोलताना शहाजीबापू पाटील व उपस्थित जनसमुदाय दिसत आहे

test banner