शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
याचवेळी त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सोमवारी कोण कोणत्या मतदारसंघातून माघार घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. याचवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म न पाळता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याविरोधात काँग्रेसकडून काळुंके यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीकडून शहर मध्य मतदारसंघात जुबेर बागवान यांचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. शहर मध्यमध्ये काँग्रेस, सेना, माकप, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत होणार, हे निश्चित आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस व भाजप यांच्यात दुरंगी लढत होणार असली तरी लिंगायत समाजाने स्वतंत्र उमेदवार दिल्याने लढतीत रंगत आणली आहे. परंतु, लिंगायत समाजाचा उमेदवार कायम राहणार का? हे मात्र सोमवारी दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काठे यांनी अर्ज कायम ठेवल्यास येथे भाजपचे पालकमंत्री वियजकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शिवसनेच्या शैला गोडसे आणि भाजपचे समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे. गोडसे आणि आवताडे यांच्याबरोबरच काँग्रेसच्या काळुंके यांनीही उमेदवारी कायम ठेवल्यास या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून सेनेच्या दिलीप सोपल यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर यांना उमेदवारी दिली आहे. बार्शीमध्ये या तिघांमध्येच प्रमुख लढत होणार आहे. करमाळ्यात सेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्याने आ. नारायण पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीने संजय पाटील-घाटणेकर यांना उमेदवारी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जयवंतराव जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्यास करमाळ्यात पंचरंगी लढत होणार आहे.
मोहोळमध्ये महायुतीकडून शिवसेनेने नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्याने नगरसेवक मनोज शेजवाल यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम यांना डावलून राष्ट्रवादीने यशवंत माने यांना उमेदवारी दिल्याने कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यास येथे चौरंगी लढत होणार आहे.
माढा मतदारसंघात महायुतीकडून सेनेने संजय कोकाटे यांना उमेदवारी दिल्याने शिवाजी कांबळे आणि मीनल साठे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केले. या दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यास येथे राष्ट्रवादीचे आ. बबन शिंदे, सेनेचे संजय कोकाटे, अपक्ष कांबळे आणि साठे यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि सेनेचे शहाजी पाटील यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे. माळशिरस आणि अक्कलकोट मतदारसंघात दुरंगी लढत होणार, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.