आष्टी तालुक्याचा ईशान्य भाग प्रामुख्याने ऊसतोड कामगाराचा भाग म्हणून ओळखला जातो.डोईठाण हे धामणगाव बीड रस्त्यालगत असलेले गाव ही त्याला अपवाद नाही.याच गावातील विठोबा सातपुते आणि जिजाबाई सातपुते यांचा राम हा धाकटा मुलगा.रामला तीन बहिणी,तिघींचे विवाह झालेले.एकुलता मुलगा असलेल्या राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री म्हणून काम केले आहे.घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आणि परंपरागत व्यवसायातून आणि कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने विठोबा आणि जिजाबाई सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर साखर कारखाना येथील उसाच्या फडात आठ वर्षे उसतोडणीचे काम केले.याच तालुक्याच्या मतदारसंघाची निवडणूक आपला मुलगा कधी लढवू शकेल हे त्यांच्या स्वप्नात ही नव्हते.
आता ते राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या महायुतीचे उमेदवार आहेत.राम सातपुते यांच्या डोईठाण येथील घरी भेट दिली तेव्हा त्यांच्या आई जिजाबाई घरी होत्या.त्यांनी सांगितले की , राम हा पूर्वी पासून खूप कष्टाळू.कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला.शिक्षण पूर्ण केल्यावर राजकारणात जाणार असल्याचे सांगितले.आम्ही त्याला विरोध केला नाही.आता तो आमदार होण्यासाठी निवडणूक लढवणार आहे.आमदाराने काय काम करायचं असतं ते मला माहित नाही पण एवढं लोक त्याच कौतुक करताहेत म्हणजे नक्कीच मोठं काम असणार आहे.आम्ही त्यामुळे खूप आनंदित आहोत.