धनश्री महिला पतसंस्था व मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

धनश्री महिला पतसंस्था व मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना



मंगळवेढा (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारासह विविध जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. याबाबत शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे.
धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून पूरग्रस्तांसाठीचे हे योगदान मोलाचे आहे, असे सांगून पूरग्रस्तांबद्दल दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल धनश्री परिवाराचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले. याप्रसंगी दामाजी शूगर्स माजी संचालक रामकृष्ण नागणे, प्रभाकर कलुबर्मे, युवराज गडदे, महा ऑरगॅनीक अॅन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांच्यासह इतरजण उपस्थित होते.
कोल्हापूर, सांगली व भीमा नदीकाठच्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पूरग्रस्तांना धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व धनश्री मल्टिस्टेट को - ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा यांच्या वतीने विविध स्वरूपात मदत केली आहे. यामध्ये सुरवातीला कोल्हापूर व सांगली या भागातील पूरग्रस्तांसाठी दोन्ही संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी आपल्या घरातुन भाकरी, चपाती व संस्थेमार्फत पाणी बॉटल, बिस्किटे पाठविल्या आहेत. सांगली भागातील 250 कुटुंबातील पूरग्रस्तांना मदत म्हणून एक लाख रुपयांचे चादर व सतरंजी वाटप केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठ असलेल्या पंढरपुर शहरात तसेच कौठाळी आणि शिरढोण या गावासह मंगळवेढा तालुक्यातील तांडोर, तामदर्डी, सिद्धापूर या गावातील पूरग्रस्त नागरिकांना एक किलो साखर, तांदूळ व चहापत्ती देऊन मदत केली आहे. त्याचबरोबर आता पूरग्रस्तांसाठी कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. अशाप्रकारे धनश्री परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत पूरग्रस्तांसाठी जवळपास तीन लाख रुपयेपर्यंत मदत केली आहे.
test banner