ज्याच्याकडं मरण्याची हिंमत असते, त्याने लेखणीला हात घालावा- उत्तम कांबळे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

ज्याच्याकडं मरण्याची हिंमत असते, त्याने लेखणीला हात घालावा- उत्तम कांबळे


मंगळवेढा (प्रतिनिधी)मंगळवेढा येथील धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभा शिवाजीराव काळुंगे यांच्या मातोश्री रुक्मिणी जाधवबाई यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा दै.सकाळचे संपादक, ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ.कृष्णा इंगोले हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये बी.टी.पाटील, सि.बा.यादव, मनोहरपंत धोेंगडे, प्रा.शिवाजीराव काळुंगे हे मान्यवर होते. प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना म्हणाले,  फक्त दहा ओळींची कविता लिहिली की कवी अजरामर होतो. जगात सौंदर्य नाही का? ते खूप आहे. परंतु त्या सौंदर्याला स्थळाची आणि काळाची मर्यादा आहे. आजची सुंदर स्त्री दहा वर्षांनी सुंदर असणार नाही. साहित्यिक सौंदर्याची निर्मिती करतात. ते निर्मितीक्षम असतात. समाजातून साहित्य वगळले तर समाज निष्प्रभ होईल. या साहित्य पुरस्कार सोहळ्यामध्ये कथा, आत्मकथा, कादंबरी, कविता, संपादन ग्रंथ, संशोधन ग्रंथ या सर्व प्रकारातील लिहित्या हातांना तुम्ही प्रोत्साहन दिले आहे. हे प्रोत्साहन साधे नाही. ते एका आईच्या नावाने दिलेले प्रोत्साहन आहे. शोभाताई काळुंगे यांच्या आईच्या जागी मला माझीच आई दिसत होती. इतकं सामर्थ्य आईच्या ठिकाणी असतं. रुक्मिणी जाधवबाई हे नाव खूप महत्त्वाचं आहे. यात बाई हे विशेषण आहे. आई पेक्षा बाई वेगळी असते. आईत फक्त आई असते. बाईत आईसह बापसुद्धा असतो. रूक्मिणीबाई आईही झाल्या आणि आपल्या सहा मुली वाढवताना बापाचीही जबाबदारी पार पाडली. बाई हा मूल्यांनी समृद्ध असा शब्द आहे.
   लढत लढत जीवन सुंदर कसं करायचं. आईचं स्मरण कसं करायचं याचं उदाहरण म्हणजे हा सोहळा आहे. जीवनातील कला माणसाचं जगणं सुरूप करतात. व्यवस्था माणासाचं जीवन कुरूप करतात. जगात तोच माणूस कर्तबगार असतो. ज्याचा निर्माता कर्तबगार असतो. बाई हा कर्तबगार माणसाचा निर्माता आहे. आज पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांनी लिहतं राहिलं पाहिजे. आता जे काही लिहिलं आहे, ते प्राथमिक स्वरूपाचं आहे असं समजावं. ते माध्यमिक, उच्चमाध्यमिकपर्यंत कसं जाईल याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. साहित्यिकांकडं प्रचंड अहंकार असतो. स्वाभिमान असतो. तो असायलाही हवा. लिहिणारे खूप आहेत. पण आपण हे का लिहितो ते कळणारे खूप कमी आहेत.  मी का लिहितो ? माझ्या लिहिण्याचं कारण काय आहे. ते मला कळलं पाहिजे. का जगतो आम्ही ? जन्माला आलो म्हणून जगतो का?  गाढवंपण जगतात. अशीच जगतात. का जगतो हे त्यांना सांगता येत नाही. गाढवापेक्षा वेगळं जगण्याचं कारण सांगता आलं पाहिजे. जगतो का हे सांगता आलं पाहिजे. मी लिहितो का हे सांगता आलं पाहिजे. मला लेखक व्हायचंय म्हणून लिहितो का? माणूस स्वत:ला व्यक्त करू शकला नाही तर तो वेडा होतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा इंगोले अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज मंगळवेढ्यात इतिहास घडत आहे. एका विचारपीठावर इतके रथी-महारथी एकाच वेळी उपस्थित आहेत. सर्वांना विचार करायला लावणारा, चिंतन करायला लावणारा हा सोहळा आहे. ज्या मंचावर मोठी माणसं असतात, त्यांची उंचीच कार्यक्रमाची उंची ठरवतं. शोभाताई काळुंगे यांनी हा साहित्यिकांसाठी हा सोहळा आयोजित करण्याची घटना म्हणजे एका लक्ष्मीनं सरस्वतीला मुजरा केल्यासारखे आहे. आज माणूस भौतिक सुखानं समृद्ध आहे. पण ही समृद्धी पचवणारं मन त्याच्याकडं नाही. साहित्य-कला असं मन घडवायला मदत करतं.
याप्रसंगी साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात नामदेव चव्हाण, डॉ.अरुण शिंदे, डॉ.वामन जाधव, प्रा.शिवाजी बागल, वासंती मेरू, नारायण घुले, दिनकर काकडे, डॉ.दिनकर कुटे, हेमंत रत्नपारखी, बबन धुमाळ, बजरंग दत्तू, अंकुश गाजरे, धनंजय पाटील, भालेराव शेवडे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन व्हटकर, प्रसिद्ध व्याख्याते दत्ता थोरे, कवी शिवाजी बंडगर, डॉ.मिनाक्षीताई कदम, मच्छिंद्र भोसले, मोहन जुंदळे, हजरत काझी, श्रीरंग काटे, दत्तात्रय जमदाडे, तुकाराम नागणे, ज्ञानदेव जावीर, युन्नुस शेख, अ‍ॅड.भारत पवार, बबन ढावरे, प्रा.अकबर मुलाणी, नामदेव पोळ, सुरेश पवार, अ‍ॅड.वसंत करंदीकर, प्रा.संजय शिवशरण, भारत शिंदे, मंगल बनसोडे, समाधान क्षीरसागर, मीनाक्षी शिंदे, सुधा मांडवे, अ‍ॅड.राहूल घुले, नीळकंठ कुंभार, पोपट महामुरे, सुहास पवार, सतीश दत्तू, लक्ष्मण नागणे, कवी शिवाजी सातपुते, सुहास ताड, शशिकांत जाधव, प्रशांत मोरे, गणेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते. हृद्य आणि जिव्हाळ्याच्या ओलाव्याने समद्ध करणार्‍या या साहित्य सोहळ्यामध्ये वैचारिक मांडणीने रसिक श्रोत्यांना जागृतीचा किनारा लाभला. तृप्ततेच्या अक्षर ओंजळी भरून रसिक बाहेर पडला. या प्रसंगी उत्तम कांबळे यांच्या पुस्तकांचा स्टॉलही लावण्यात आला होता. ती सर्व पुस्तके रसिकांनी विकत घेतली. साहित्य सोहळ्याच्या निमित्ताने वैचारिक पर्वणी ठरावा असाच हा सोहळा.
या कार्यक्रमात स्वागत प्रा.शिवाजीराव काळुंगे, प्रास्ताविक शोभाताई काळुंगे, सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले आणि आभार डॉ.राजलक्ष्मी गायकवाड यांनी मानले.

 





   

test banner