मंगळवेढा :-
व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने वारी परिवार सायकल क्लब, मंगळवेढा यांच्या वतीने १२ नोव्हेंबरपासून मंगळवेढा ते कन्याकुमारी अशी १३५० किलोमीटरची व्यसनमुक्ती जनजागृती सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरात नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती पत्रके वाटप करण्यात आली व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ शिवालयातून करण्यात आला.
सदर पत्रकाद्वारे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, व्यसनांचे दुष्परिणाम समजून घ्यावेत आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश देण्यात आला आहे.
मंगळवेढा ते कन्याकुमारी असा सुमारे १३५० किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतून होणार असून, सायकल यात्रेद्वारे विविध ठिकाणी व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे.
ना व्यसन करणार, ना करू देणार, व्यसनमुक्त समाज घडवणार हा संकल्प घेऊन वारी परिवार सायकल क्लबने सुरू केलेला हा उपक्रम समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी राजवीर दत्तू,पृथ्वीराज कलुबर्मे,रणवीर दत्तू,स्वप्निल टेकाळे,राहुल पाटील,रतिलाल दत्तू,रिहान सय्यद,प्रफुल्ल सोमदळे,निखिल दत्तू,कृष्णा दत्तू,माणिक गुंगे,शिवतेज कलु बर्मे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी उपस्थित होते.
