नवरात्र महोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६

नवरात्र महोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न



मंगळवेढा (प्रतिनिधी) :

 नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १, मंगळवेढा येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली गटवार प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ‘ज्ञान आपल्या दारी’ या पुस्तिकेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण सात गटांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची गोडी वाढावी, स्मरणशक्ती व आकलनशक्ती विकसित व्हावी, तसेच स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञान आपल्या दारी’ या पुस्तिकेवर आधारित एकूण २८ प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.


या स्पर्धेत इयत्ता चौथीतील पियुषसिंग राजपूत व सहकाऱ्यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले, तर इयत्ता तिसरीतील गाथा सोमदळे व सहकाऱ्यांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद संपादन केले. विजेत्या व उपविजेत्या गटांना संजय चेळेकर सर यांच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


या स्पर्धेचे सूत्रसंचालन संजय चेळेकर सर यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धेचे गुणांकन आशा वाले मॅडम यांनी केले, तर मारुती दवले सर यांनी सुपरव्हिजनची जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापक निंगाप्पा कोळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान पुरेसे नसून अवांतर वाचन, सामान्य ज्ञान आणि विविध स्पर्धांमधील सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, निर्णयक्षमता, संघभावना आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध झाली.


विजेत्या व उपविजेत्या गटातील सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणारा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होत आहे.



test banner