नगरपालिका कन्या शाळा क्र. १ मंगळवेढा मध्ये १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

नगरपालिका कन्या शाळा क्र. १ मंगळवेढा मध्ये १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव




मंगळवेढा (प्रतिनिधी) : 

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नगरपालिका कन्या शाळा नंबर १, मंगळवेढा येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्साहपूर्ण वातावरणात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त, सदाचार व देशप्रेमाचे विचार प्रभावीपणे मांडत आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखवून उपस्थितांची मने जिंकली.




लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रभावी संवादकौशल्य, विचार मांडण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व्यासपीठावर येऊन आपले विचार मांडले. त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.



स्पर्धेत इयत्ता पहिलीमध्ये सृष्टी देवकते हिने प्रथम, सिद्धी राऊत हिने द्वितीय, तर कृतिका घाडगे हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता दुसरीमध्ये अपूर्वा करांडे प्रथम, आरिश शेख द्वितीय, तर तन्वी दवले तृतीय ठरले.


इयत्ता तिसरीच्या मुलांच्या गटात श्रीरंग पवार प्रथम, धैर्यशील यादव द्वितीय, तर प्रथमेश जानकर तृतीय ठरले. इयत्ता तिसरीच्या मुलींच्या गटात गाथा सोमदळे प्रथम, ईश्वरी जाधव द्वितीय, तर शिवांजली काळुंगे तृतीय ठरल्या. इयत्ता चौथीमध्ये शरयू सावंजी प्रथम, आरव वाघ द्वितीय, तर समृद्धी गांडुळे तृतीय ठरले.



अशोक चौगुले सरांचे प्रेरणादायी दातृत्व


स्पर्धेतील सर्व १५ गुणवंत विद्यार्थ्यांना दामाजी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. श्री. अशोक चौगुले सर यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी चौगुले सरांनी केलेले हे दातृत्व निश्चितच कौतुकास्पद ठरले.


यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मा. श्री. अशोक चौगुले सरांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. निंगप्पा कोळी सर, श्रीमती आशा वाले मॅडम, श्री. संजय चेळेकर सर व श्री. मारुती दवले सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महात्मा गांधींच्या विचारांना विद्यार्थ्यांच्या कृतीशी जोडणारा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

test banner