शिष्यवृत्ती परीक्षेतील ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

शिष्यवृत्ती परीक्षेतील ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न



प्रतिनिधी :

 नगरपालिका शिक्षण मंडळ, मंगळवेढा अंतर्गत इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चार शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १, मंगळवेढा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


या कार्यक्रमास मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या पीएसआय मा. आरती कणेरी मॅडम व नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मा. डॉ. बिभीषण रणदिवे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून नगरपालिका शिक्षण मंडळाचा नावलौकिक वाढविणाऱ्या ७० विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिश्रम आणि योग्य नियोजन करणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक श्री. अर्जुन आवताडे, श्री. विशाल गायकवाड, श्री. शिवलिंग राऊत व मा. भारती नागणे (धनवे) मॅडम यांचा गौरव करण्यात आला.



यावेळी बोलताना पीएसआय आरती कणेरी मॅडम यांनी मंगळवेढ्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. “चांगले शिक्षक मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी खरेच भाग्यवान आहात. विद्वान व कर्तृत्ववान शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच तुम्हाला हे उल्लेखनीय यश मिळाले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तके वाचावीत, चांगले मित्र बनवावेत आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले.


प्रशासनाधिकारी मा. डॉ. बिभीषण रणदिवे यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक, गुणवंत विद्यार्थी तसेच पालकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानावर जाऊन विविध खेळ खेळले पाहिजेत. शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाला महत्त्व आहे,” असे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाबरोबरच क्रीडा व इतर उपक्रमांसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



शिक्षक नेते श्री. संजय चेळेकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या गुणवत्तेला योग्य प्रोत्साहन मिळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले यश हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यावेळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक श्री. अर्जुन आवताडे, तसेच गुणवंत विद्यार्थी जयदीप सुतार, राजेश्वरी गायकवाड, श्रद्धा देवकर व दिव्या घाडगे यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या यशामागील अनुभव सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील शिंदे सर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका मा. आशा वाले मॅडम यांनी मानले.


या गौरव सोहळ्यास ७० गुणवंत व यशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारा हा गौरव सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.


“गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या यशाचे कौतुकच नव्हे, तर भविष्यातील मोठ्या स्वप्नांसाठी त्यांना मिळालेली प्रेरणेची शिदोरी होय,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

test banner