मंगळवेढा:-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी मंगळवेढेकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली मंगळवारी दि.११ ऑगस्ट शहरात मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
शिवतीर्थ, शिवप्रेमी चौक येथून रॅलीला सुरुवात झाली.हातात तिरंगा ध्वज आणि मोटरसायकलींवर डौलाने फडकणारे राष्ट्रध्वज,तसेच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण शहराचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
रॅलीमध्ये माजी सैनिक संघटना,युवक,ज्येष्ठ नागरिक, महिला,विद्यार्थी,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि देशप्रेमाचा संदेश दिला.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाची आठवण करून देत रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रॅलीदरम्यान नागरिकांनी तिरंग्याचा सन्मान राखत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला.रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले.अनेकांनी तिरंग्याला अभिवादन करत देशभक्तीच्या घोषणा दिल्या.भारतीयाची जबाबदारी आहे या भावनेतून रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे मंगळवेढा शहरात देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश पोहोचला.
हर घर तिरंगा अंतर्गत सर्वांनी झेंडे घरावरती लावण्यासाठी दोन हजार झेंड्याचे वाटप करण्यात आले.यावेळी शशिकांत चव्हाण,सिद्धेश्वर आवताडे,मल्लया स्वामी,तेजस्विनी कदम,सुदर्शन यादव,सतीश दत्तू,नागेश डोंगरे,विनायक कलुबर्मे,अनंत कुलकर्णी यांनी सहभाग नोंदवला.
