मंगळवेढा : प्रतिनिधी
सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारावे, या मागणीसाठी मंगळवेढेकरांच्या वतीने व्यापक सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.मुरलीधर चौक येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ही सह्यांची मोहिम आयोजित करण्यात आली होती.
“आम्ही मंगळवेढेकर स्मारकाचे होणार साक्षीदार” या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध क्षेत्रातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दर्शवला.
अनेकांनी ही केवळ स्मारकाची मागणी नसून सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले.मंगळवेढेकरांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सात दिवसांच्या “स्मारक प्रबोधन सप्ताहा” अंतर्गत या सह्यांची मोहिम राबविण्यात आली.
या सप्ताहादरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार, त्यांचे समाजकारण आणि समानतेचा संदेश याबाबत माहिती देण्यात येत आहे.यामुळे युवकांमध्ये विशेष जागरूकता निर्माण होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांनी शासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन मंगळवेढा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे, अशी ठाम भूमिका व्यक्त केली.
अनेकांनी बसवेश्वरांचे कार्य आणि त्यांचे मंगळवेढ्याशी असलेले ऐतिहासिक नाते लक्षात घेता हे स्मारक याच ठिकाणी उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नोंदवले.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, ही मोहिम पुढील काही दिवस अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. तसेच जमा झालेल्या स्वाक्षऱ्या शासनाकडे सादर करून स्मारकाच्या मागणीसाठी पुढील पाठपुरावा करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे मंगळवेढा शहरात सामाजिक ऐक्य आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.एकूणच, महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी उभारलेली ही सह्यांची मोहिम मंगळवेढेकरांच्या एकजुटीचे प्रतीक ठरत असून, शासनाने या भावनांची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
