मंगळवेढा : प्रतिनिधी
संत बसवेश्वर महाराजांच्या जन्मभूमी बागेवाडी येथून निघालेली ‘बसवज्योत’ सायकल यात्रा रविवारी सायंकाळी सहा वाजता मंगळवेढा येथील संत दामाजी चौकात दाखल होताच बसवप्रेमींनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
संत बसवेश्वर महाराजांनी तब्बल तेरा वर्षे मंगळवेढा परिसरात कार्य केले. त्यांच्या कार्याचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि येथे राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारले जावे, या प्रमुख मागणीसाठी ही सायकल यात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावात स्मारकाच्या गरजेबाबत जनजागृती करण्यात आली.
या ‘बसवज्योत’चा प्रारंभ बागेवाडी येथील संत बसवेश्वर मंदिरातून करण्यात आला. रविवारी पहाटे मंदिराच्या मठाधिपती सिंध्यलिंग स्वामीजी उपस्थितीत व डॉ.महंतेश जालगिरे,राष्ट्रीय बसव सैनिक संघटनेचे संघटक अध्यक्ष,शरणगौडा एस. बिरादार, राष्ट्रीय बसव सैनिक संघटनेचे संचालक श्रीकांत कोटप्पा आदी मान्यवरांच्या हस्ते ज्योत पूजन करून सायकलस्वार मंगळवेढ्याकडे रवाना झाले.
या दोन दिवसीय प्रबोधन यात्रेत एकूण 30 जणांनी सहभाग नोंदवला.विजापूर सायकल क्लबच्या सदस्यांनीही यात्रेत सहभाग घेत कर्नाटक सरकार व प्रशासनाच्या मदतीने स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बागेवाडी–मंगळवेढा मार्गावरील उमदी,हुलजंती, शिवणगी,मरवडे परिसरात शेकडो नागरिकांनी ज्योतीचे दर्शन घेतले.घोषणांनी आणि स्वागताने संपूर्ण परिसर भारावून गेला. ग्रामीण भागातही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी डिजिटल बोर्ड, दुचाकींवरील स्टिकर्स आणि घरपोच पत्रकांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.
या पहिल्याच उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील पाच दिवसांच्या कार्यक्रमांनाही नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल, असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. संत बसवेश्वर स्मारकासाठीची ही चळवळ आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत
