मंगळवेढा:-
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे मानवासह पक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.या कडक उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचा मृत्यू दरही वाढतच आहेत अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड,वाढणारी सिमेंटची जंगले,यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र असताना मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने मात्र पर्यवारण रक्षणार्थ मंगळवेढा ते जत पक्षी वाचवा सायकल अभियान राबवून निसर्गा प्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे.
पाण्याचा अतिरेक वापर करून रंगपंचमी साजरी करण्यापेक्षा पक्षांसाठी पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करा हा संदेश देण्यासाठी ६५ किलोमीटर सायकलिंग करून स्तुत्य उपक्रम केला आहे.
निसर्ग साखळीत पक्ष्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे याच उदात्त हेतूने वारी परिवार सायकल क्लबमधील पक्षी प्रेमी सदस्यांनी मंगळवेढा पाठखळ,खुपसंगी,गोणेवाडी,शिरशी,पारे घेरडी,जत या मार्गांवरती टाकावू वस्तूपासून पक्षांसाठी तयार करण्यात आलेली भांडी झाडांना आडकावून पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करून प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला आहे.
लोकांनी आपल्या घराच्या बाहेर अंगणात शेतात,गच्चीवर पक्षांसाठी टाकाऊ वस्तू पासून छोटी घरटी तयार करून चारा आणि पाणी ठेवून आधार द्या अशी जनजागृती करण्यात आली यावेळी पक्षी वाचवा निसर्ग वाचवा,पक्षासाठी घरटी बनवू मूठभर धान्य अंगणात ठेवू,पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण,चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये,एक पक्षी की जान बचाए,जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ,पक्षी बचाव जीवन बचाव असे एक ना अनेक संदेश देऊन पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी सायकल वरती लावलेले पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा चे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अनुकरणही सुरु केले आहे.
समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल व पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल शिवाय मुलांमध्येही आवड निर्माण होऊन त्यांच्याकडून निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न होईल असा नारा देत वारी परिवार सायकल क्लबने एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन आदर्श उभा केला आहे.
यावेळी सदर सायकल अभियानात वारी परिवार सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्नील टेकाळे,शिवन्या कलुबर्मे,प्रफुल्ल सोमदळे,अविनाश जाधव,गणेश मोरे,भारत नागणे,नागेश डोंगरे,प्रा.महेश अलिगावे,रविराज जाधव,सुरज घुले,प्रकाश दिवसे,प्रा.विनायक कलुबर्मे आदींनी सहभाग नोंदविला.
