(प्रतिनिधी):-
ॲग्रीकॉस कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर मा.अजय आदाटे यांनी कृषी दिनानिमित्त बार्शी येथे पार पडलेल्या प्रियदर्शनी ॲग्री कन्सल्टन्सी वर्धापन सन्मान सोहळा कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर विविध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.
या कार्यक्रमात त्यांनी घरगुती भाजीपाला लागवड, तूर लागवड तंत्रज्ञान आणि जांभूळ लागवड पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या अंगणात किंवा कमी जागेतही भाजीपाला पिकवण्यासाठी कोणती तंत्रे वापरावी, याचे प्रत्यक्ष उदाहरणासह स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तसेच, तूर लागवडीसाठी मातीचे प्रकार, खतांचे प्रमाण, आंतरमशागत, व पाण्याचे नियोजन कसे करावे, याबाबत त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. जांभूळ लागवडीत योग्य जातींची निवड, रोपांचे अंतर, पाणी व्यवस्थापन व रोग नियंत्रणाचे उपायही उलगडून सांगितले.
प्रियदर्शनी ॲग्री कन्सल्टन्सी चे संस्थापक अमोल वाघमारे आणि प्राजक्ता वाघमारे दाम्पत्यांनी विविध क्षेत्रामधील उद्योजक आणि शेतकऱ्यांना सन्मानित केले त्यामुळे भविष्यात अजून चांगले करण्याची उमेद त्यांना मिळाली.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPM) यावर दिलेले मार्गदर्शन. त्यांनी कीटकनाशकांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपाय व जैविक घटकांचा वापर करून कशी खर्चात बचत करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल, हे स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे उपस्थित शेतकरी भारावून गेले असून, त्यांनी या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीत वापर करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शेतकऱ्यांनी ॲग्रीकॉस टीमचे आभार मानले.