डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शेतीविचार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शेतीविचार.



नमस्कार मंडळी,


आजचा लेख खुप छान आहे आपण वाचाल अशी मला खात्री आहे प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करून  पुढील लेखनास सुरुवात करतो.


शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1992 नंतर स्वीकारलेल्या जागतिकीकरणाच्या धोरणानंतर, या देशात चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे सत्र आजही थांबायला तयार नाही. आपल्याला अर्थशास्त्री, समाजशास्त्री, कायदेतज्ञ बाबासाहेब ठाऊक आहे. पण बांधावरच्या शेती आणि शेतकऱ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. 


आपल्या माहीत असेल नसेल तरी आठवण करून देतो की डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना शेतकरी व शेती बद्दल जान होती यांना गावामध्ये समाज व्यवस्थेची जानीव होती. त्याच प्रमाणे शेतीबद्दलही ज्ञान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. त्या महानायकाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी शेतीचा बारकाईने विचार केला.महत्वाचं म्हणजे ही पहीली व्यक्ती आहे की शेतकर्याच्या हीताचा व सिंचनाबाबतीत बोलत होते शेतकऱ्याला शेती ला सिंचनासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. सिंचना शिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही.


शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, शेतमजूर आणि अवघा देश समृद्ध होण्यास मदत होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत.


बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयक चिंतन किती मूलगामी होते. प्रागतिक चळवळींना बळ देत असताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणिवेतून ते पाहतात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगद्विख्यात अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी शेतीच्या प्रश्नाविषयी मुलभूत अभ्यास केलेला होता. शेतीचा नेमका प्रश्न काय आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी त्यांनी केलेली मांडणी आजही आपल्याला मार्गदर्शक आहे.


अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. छोट्या क्षेत्रावर शेतीत आधुनिकीकरण करून उत्पादन वाढविणे शक्य होणार नाही, यावर बाबासाहेबांचे ठाम मत होते.


एकूणच शेती आणि ग्रामीण समाज जीवनाची सखोल जाण असलेले...शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही असलेले...'लहान शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावरील उपाय' हा संशोधनपर ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे, शेतीचे प्रश्न मांडण्याबरोबरच ते सोडवण्यासाठी देशात पहिल्यांदा 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढणारे, सलग 7 वर्षे दीर्घकाळ शेतकरी आंदोलन करणारे शेतकरी नेते म्हणून डॉ. आंबेडकरांची एक वेगळी ओळखही आहे. 


शेतीच्या उत्पन्नाचा विचार न करताच वसूल केल्या जाणार्‍या शेतसार्‍यास त्यांनी विरोध दर्शविला. 18 ऑगस्ट 1925 ला प्रसिद्ध झालेल्या शेतकर्‍यांचे प्रश्न या लेखात शेतीच्या निव्वळ काल्पनिक उत्पन्नाच्या अंदाजावरून सरसकट शेतसारा आकारणी गैर आणि अन्यायकारक आहे, अशी मांडणी त्यांनी केली.


शेतीसाठी लागणारी अवजारे आधुनिक पाहिजेत, पारंपरिक पद्धतीने केलेली शेती कधीच फायदेशीर ठरणार नाही, आधुनिकीकरणासाठी जमिनीचे छोटे-छोटे तुकडे नाही तर एकत्रिकरण होणे आवश्यक आहे. शेतीला दर्जेदार बियाण्याची गरज आहे ही त्रिसूत्री शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक असल्याचे बाबासाहेबांनी त्या वेळेस सांगितले होते.


देशातील ८० टक्के जनता शेतीवर उदरनिर्वाह करत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा लक्षात घेऊन या क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करावे आणि शेतकऱ्यांना भांडवल पुरवावे, अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, कसदार बियाणे, उत्तम खते  देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे बाबासाहेबांनी ठासून सांगितले होते.


शेती उत्पादन वाढ करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री सुचवली होती. 


1. शेतीसाठी लागणारे अवजार आधुनिक असले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती कधीच समृद्धी आणू शकणार नाही. 

2. आधुनिकीकरण करण्यासाठी जमिनीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांचे एकत्रिकरण होणे आवश्‍यक आहे. 

3. शेतीला दर्जेदार बी-बियाणांची गरज आहे. त्याशिवाय शेती चांगली होऊ शकत नाही. 


शेतीची उत्पादकता वाढावी म्हणून शेत जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती, सिंचनाची सोय, भांडवली गुंतवणूक केली तरच शेती लाभाची ठरेल. 



१९३४ मध्ये शेतकरी परिषद भरवण्यात आली होती, त्याचे अध्यक्षपद बाबासाहेबांकडे होते. याच परिषदेत बाबासाहेबांनी शेतकरी मजूर पक्षाची घोषणा केली होती.


शेती हा बाबासाहेबांचा जिव्हाळ्याचा विषय होता. साडेसात वर्षें त्यांनी कोकणात शेतकऱ्यांचे आंदोलन चालवले. त्यातून जमीनदारी, सावकारी बंद होण्यास मदत झाली



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार खालीलप्रमाणे होते:


शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, शेतमजूर आणि देश समृद्ध होईल. 

शेती हा राष्ट्रीय उत्पादनाचे साधन आहे. 

पारंपरिक शेतीवर शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे शक्य नाही. 

लहान-लहान तुकड्यांमध्ये शेती करणे किफायतशीर नाही. 

जमिनीचे एकीकरण करून विस्तारीकरण करावे. 

छोट्या शेतकऱ्यांना विनाशापासून वाचवण्यासाठी विशिष्ट आकाराच्या सहकारी शेतीचा उपाय करावा. 

सामुदायिक शेतीचा प्रयोग भारतभर झाला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा होती. 


सामुदायिक शेती आणि त्यातूनच पुढे शासकीय समाजवाद विकसित झाला पाहिजे. सामुदायिक शेतीमुळे जमीनदार, कुळ व शेतमजूर असा भेद संपुष्टात येईल, ही त्यांची धारणा होती. ही समग्र धारणा स्वतंत्र भारताच्या एकूणच सामाजिक आणि आर्थिक पुनर्रचनेबाबतचा पृथक भूमिकेचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.


नदी जोड प्रकल्पाबाबत बाबासाहेबांनी त्या वेळेस तत्कालीन सरकारला सूचना दिल्या होत्या. त्या वेळेस हा सल्ला प्रत्यक्षात अमलात आणला असता तर आज भेडसावणाऱ्या अनेक समस्या सुटल्या असत्या. बाबासाहेबांचे पाणी प्रकल्पातील योगदान आणि त्यांची असणारी दूरदृष्टी ही वाखाणण्याजोगी आहे. १९४५ मध्ये हीराकुंड धरणाची पायाभरणी पंडित नेहरू यांनी केली होती. नेहरू धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हणत होते, या मंदिरांच्या पायाभरणीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले होते.


शेती जर चांगली व्हावी असे वाटत असेल तर पावसाची गरज आहे. आपल्या देशात बहुतांश भागात पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. पाऊस हवा असेल तर जंगल क्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे, असे डॉ. बाबासाहेबांनी 7 दशकांपूर्वी लिहून ठेवलेय. ते पुढे म्हणतात, सरकारने वनीकरणाचा कार्यक्रम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. अनेक राज्य सरकारांना दुष्काळी परिस्थितीनंतर याची जाणीव झाली. आज अनेक राज्यांनी वनीकरण, वृक्ष लागवडीच्या मोहिमा हाती घेतल्याचे दिसते. 


अलीकडे प्रत्येक राजकारणी म्हणतो की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती पुत्र आहे वगैरे वगैरे.शेतकऱ्यांना संबोधित करताना बाबासाहेब म्हणतात, 'शेतकरी बांधवांनो, आज तुमची संख्या शेकडा ८० टक्क्यांपेक्षा जास्त असताना, सरकारी नोकरीत तुमचे एवढे थोडे लोक असावेत, हे कशाचे निदर्शक आहे? मला तुमच्यापैकी 'प्राइम मिनिस्टर' झालेला पाहायचा आहे. मला या मूठभर शेठजींचे राज्य नको आहे. तुम्हा ८० टक्के लोकांचे राज्य हवे आहे. शेतीत राबणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांनाच या क्षेत्राचे प्रश्न समजू शकतात आणि तेच या प्रश्नांची सोडवणूक करू शकतील.'

आज हा महामानव आपल्यात नाही परंतु त्यांनी पेरणी केलेली धोरणाची फळं आज आपण चालत आहोत, देश अन्नधान्याच्या बाबत हरितक्रांती आणि धवल क्रांतीच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झाला कस करा परंतु शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या आजही कायम आहेत, माहिती नाही.. मराठीत म्हण आहे इडा पिडा टळु आणि बळीच राज्य येवो.. शेतीमातीमध्ये राबणारा आमचा कास्तकऱ्याचं भवितव्य उज्वल करायचं असेल तर तुमच्या आमच्यातलाच बाबासाहेब पुढे यायला पाहिजे याबद्दल मनात कुठलीही शंका नाही.


जलसिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्याशिवाय शेती फायद्यात राहणार नाही, शेतीत आधुनिक यंत्रे आणली पाहिजेत, शेती ही समुदायाने करून त्यात सामुदायिक शेती पद्धती विकसित झाली पाहिजे असे उदात्त विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. त्यांच्या विचारांचा अवलंब करणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हेच खरे या महामानवाला अभिवादन ठरेल.

- अजय आदाटे (कार्यकारी संचालक, ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. ) ९४०३४६०१९४


test banner