मंगळवेढा:-
कोणताही देश समाज घडतो तो निस्वार्थ, प्रामाणिक, ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ माणसांमुळेच .अशी माणसं समाजासाठी नवं काही देतात. समाजाचे कल्याण करतात. त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर असला पाहिजे. त्यांचे चरित्र, व्यक्तित्व व चारित्र्य वारंवार वाचले पाहिजे.अभ्यासले पाहिजे.या दृष्टीने रेश्मा गुंगे यांचे " इथे कर माझे जुळती" हे पुस्तक प्रेरणादायी आहे असे विचार डॉ.श्रुतीश्री वडगबाळकर पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.
डाॅ.श्रुती वडगबाळकर पुढे म्हणाल्या या पुस्तकातील सर्व व्यक्तिमत्वे प्रभावी आहेत. अत्यंत कष्टातून वर आलेली आहेत .त्यामध्ये भारताचे राष्ट्रपती, गायिका, कवी, लेखक, चित्रकार, अभिनेते ,शास्त्रज्ञ, उद्योजक, समाजसेवक, खेळाडू अशा विविध क्षेत्रातील जागतीक दर्जाची श्रेष्ठ माणसे आहेतच. पण सामान्यातील असामान्य माणसेही आहे.
पुस्तकावर भाष्य करताना युवालेखिका निकिता पाटील म्हणाल्या -नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी वाचन करण्याची गरज आहे.-आपले आदर्श कोण असावेत हे ठरवायला हवे.विद्यार्थी,पालक,जेष्ठ सर्वांसाठी हे पुस्तक प्रेरणा आहे.प्रा.सविता दुधभाते यानी या पुस्तकात गावपातळी पासुन अंतरराष्ट्रीय स्तरावरील आदर्श व्यक्तिमत्वांचा वेध घेतला आहे.विशेष म्हणजे ही आदर्श व्यक्तिमत्वे सामान्य कुटुंबातली, कुठलीही परंपरा नसलेली असल्याने त्यांचा जीवनपट प्रेरणा होतो.ही आदर्श माणसे आपल्या सभोवताली आज वावरणारी आहेत.त्यामुळे तो जीवंत आदर्श आपल्या समोर आजही आहे याची जाणीव हे पुस्तक करुन देते.
प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत होते.स्वागत व प्रास्ताविक डाॅ.दत्ता सरगर यानी केले. त्यानंतर म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे व शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ.सुभाष कदम, डाॅ.प्रीती शिर्के यानी रेश्मा गुंगे यांना शुभेच्छा दिल्या.
जयश्री कवचाळे यानी सुत्रसंचालन केले तर दया वाकडे यानी आभार मानले.