जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण.


आज जागतिक महिला दिन 8 मार्च 2024.


दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मात्र याच दिवशी 'महिला दिन' का साजरा केला जातो, हे फार क्वचित लोकांना माहित असेल. यामागचा इतिहास काय आणि हाच दिवस का निवडला गेला, ते जाणून घेऊयात..


रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.


थेरेसा सर्बर माल्कल!  


हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो... 

मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया.थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला  रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.


लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले. 


शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती! 


या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. Image Source

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत. 


थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे मंडळी. 

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि थेरेसा माल्कल यांना ॲग्रीकॉस सलाम!


जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे म्हणजे जगाच्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे. केवळ तो निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे म्हटल्याने त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही. ज्या लोकसंख्येचा हा दिवस आहे ती लोकसंख्या उपेक्षित लोकसंख्या आहे. एवढे सांगितल्यास या दिवसाचे महत्त्व लक्षात येईल. पण त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असूनसुध्दा उपेक्षित आहे. या महिलांना हा समाज संधीच देत नाही. त्यामुळे तिची तिच्या आत सूप्त राहिलेली कर्तबगारी ही अप्रकट राहते. मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते. परंपरेने, धर्माने, रूढीने आणि समाजाच्या पुरुषप्रधान वागणुकीमुळे निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे. तरीही मानवप्राणी स्वतःला प्रगत समजतो. ही खरी दुर्दैवाची बाब आहे. आपण आपल्या आसपास पाहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करून दिले आहे.महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते. मुलगे हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासून जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआपच चांगले व्यवस्थापन कौशल्य विकसित झालेले असते. जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवलेला आहे. महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे. ती सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पहात असल्यामुळे ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे हीही जाणीव तिच्या मनामध्ये सतत जागती असते. अशा सगळ्या गुणांनी मंडित असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी सार्‍या जगात आज जागतिक महिला दिन पाळला जातो.


आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. दहावी आणि बारावी सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. समान परिस्थितीतील मुले, शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात. हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही. सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना ‘अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली’, अशी भाषा वापरली जाते. तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकट होते.


सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे. निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल. आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्या त्यागामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे. तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे. मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही. तेव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने प्रवृत्ती वाढवली गेली पाहिजे.


✍️ॲग्रीकॉस अजय आदाटे.


test banner