६ जानेवारी २०२४, बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

६ जानेवारी २०२४, बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिन.



सर्वप्रथम आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवन

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे इ.स. २० जानेवारी १८१२ रोजी झाला. बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.


आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 


बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान​

बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बॉंबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली.


‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. 


 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती.


सामाजिक कार्य

(१)

सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून ‘बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.

(२)

जांभेकर यांना ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली.

(३)

त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.

(४)

१८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले.

(५)

बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले.

(६)

विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.

(७)

सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा पुनर्विवाह स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला. अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला.

त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.

बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.

अजय आदाटे, मंगळवेढा.




test banner