वर्ग बारावीपर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य असावा - प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर
मराठी भाषेला कोणताही विकल्प नसावा - डॉ.विकासभाऊ आमटे
भद्रावती (वि.प्र.) : श्रद्धेय बाबा आमटे त्यांच्या कार्य कर्तुत्वाने पुनीत झालेल्या आनंदवन, वरोरा येथे कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन थाटात संपन्न झाले. यात महाराष्ट्रात मराठी भाषा ही बारावीपर्यंत अनिवार्य व्हावी, ती ज्ञानभाषा व्हावी असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. हे अधिवेशन तीन सत्रात संपन्न झाले.
मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्राचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन च्या पावनभूमीत आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, प्राचार्य डॉ श्याम मोहरकर, उद्घाटक डॉ विकास विकासभाऊ आमटे, स्वागताध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर, विशेष अतिथी प्रा. श्रीकांत पाटील, अध्यक्ष लोकशिक्षण संस्था वरोरा, सुनील डिसले सर बारामती, अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र , संदीप पाटील आयपीएस नागपूर, उल्हास नरड, शिक्षण उपसंचालक नागपूर, प्राचार्य डॉ मृणाल काळे वरोरा, डॉ. प्रतिभा बिश्वास, उपाध्यक्ष महाराष्ट्र मुंबई आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व ग्रंथ पूजन करून करण्यात आली. स्वरानंद आर्केस्ट्रा च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन डॉक्टर विकास भाऊ आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन पर मार्गदर्शन करताना मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम आपण सर्व करत आहात. महाराष्ट्रात मराठी भाषा ही अनिवार्य असावी असा संदेश दिला. संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्याम मोहरकर सर यांनी मराठी भाषेपुढील आव्हाने, प्राध्यापकांच्या समस्या व प्राध्यापकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. तसेच मराठी भाषेबद्दल निर्माण झालेली अनास्था दूर करण्याचे काम आपण सर्वांनी करावे, मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी, आपण सर्वांनी विपुल लेखन करावे असे मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा दुर्लक्षित आहे, तिचे संवर्धन, संगोपन झालेच पाहिजे. शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात असे सांगितले. प्रा. श्रीकांत पाटील यांनी मराठी विषयाचे शिक्षकांनी बहुश्रुत राहून विद्यार्थ्यांना मराठी भाषेत आवड निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावे असे मार्गदर्शन केले.
सुनील दिसले राज्याध्यक्ष यांनी मराठी विषय शिक्षक महासंघाचे हे पहिलेच राज्यस्तरीय अधिवेशन हे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या आनंदवनात होत आहे आणि याचे यशस्वी आयोजन चंद्रपूर जिल्हाने केले याचा आम्हाला गौरव आहे, असे मत व्यक्त केले. आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी सध्या परिस्थितीत मराठी भाषा जनमनात रुजवण्याचं काम मराठी विषय शिक्षक करत आहात असे सांगितले. हे अधिवेशन कायम स्वरुपी स्मरणात राहावे या करिता मान्यवरांच्या हस्ते "माय मराठी" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, तसेच मराठी विषयात पीएचडी धारक उच्च गुणवत्ता प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ज्ञानेश हटवार जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर यांनी केले , तर पाहुण्यांचा परिचय डॉ सुधीर मोते जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी केले. पहिल्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. पद्मा पालांदूरकर शंकरपूर यांनी केले तर आभार प्रा. गजानन सातपुते खडसंगी यांनी केले.
दुसऱ्या सत्रात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या घटकावर विविध तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले . या सत्राचे अध्यक्ष प्रा. भगवंत शोभणे, भंडारा हे होते. अध्यक्षीय मनोगतातून भाषा विषय शिकवितांना नाविन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करावा असे सांगितले. मार्गदर्शक म्हणून डॉ माधुरी काळे वर्धा, सदस्य अभ्यासक्रम मंडळ पुणे यांनी कथा या घटकावर विवेचन पूर्ण मार्गदर्शन केले. गद्य या घटकावर डॉ शालिनी तेलरांधे नागपूर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. उपयोजित मराठी या अभ्यास घटकावर डॉ विठ्ठल चौथाले गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले. व्याकरण या महत्त्वपूर्ण घटकावर डॉ सुधीर रायपूरकर नागपूर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन प्रा. मारुती मुंडे वरोरा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सरिता कंचेवार चंद्रपूर यांनी केले.
तिसऱ्या सत्रात खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. खुले अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य धर्मराज काळे गडचांदूर तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश नखाते नागपूर, यश पवार यवतमाळ ,विजया मने गडचिरोली , संजय लेनगुरे भंडारा, डॉ राजेंद्र सोनवणे जालना आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खुल्या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात विविध ठराव घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात वर्ग बारावीपर्यंत सर्व विद्या शाखेत मराठी हा विषय अनिवार्य असावा. शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या. नवीन शैक्षणिक धोरणात मराठी विषयासह मातृभाषेतून शिक्षण दिले जावे. मराठीला अभिजीत भाषेचा दर्जा दिला जावा, आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला शासनाकडून अनुदान दिले जावे. आदी अनेक ठराव एक मताने घेण्यात आले.
या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी शेकडोच्या संख्येत उपस्थित झाले. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सुनील डिसले सर राज्याध्यक्ष , प्रतिभा विश्वास उपाध्यक्ष, बाळासाहेब माने सचिव, संपतराव गरजे कार्याध्यक्ष, डॉ ज्ञानेश हटवार चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, डॉ सुधीर मोते जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, गजानन सातपुते देविदास सालवटकर , प्रमोद बेलेकर, नरेंद्र विखार, किशोर ढोक, विनय दडमल, नामदेव मोरे, राजू केदार, ग्यानिराम गहाणे, देवेंद्र प्रधान, नंदकिशोर काकडे, रेणू देशकर,संजय मुंडे तसेच जिल्हा कार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी, मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर यांनी केले.