काय असते वेळ अमावस्या, महाराष्ट्रात कोण आणि का साजरी करतात? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १० जानेवारी, २०२४

काय असते वेळ अमावस्या, महाराष्ट्रात कोण आणि का साजरी करतात?


  मार्गशीर्ष अमावस्येला 'येळ्ळा' नावाने का ओळखतात? शेतात केला जातो मोठा उत्सव!

अमावस्या ही आनंददायी सण म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात साजरी होणारी ही अमावस्या कशी साजरी होते जाणून घ्या...

कृषी क्षेत्राशी संबंध दर्शवणारा आणि आपल्या अन्नदात्याप्रति ऋणनिर्देश करणारा सण आज म्हणजेच ११ जानेवारी अर्थात मार्गशीर्ष अमावस्येला केला जाईल. 

सोलापूर जिल्हयात आज वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बळीराजाचा हा मुख्य सण असतो. आजच्या दिवशी बळीराजाच संपूर्ण कुटुंब शेतात असते. सोबतीला मित्र नातलग पै-पाहुणे वन भोजनाचा आनंद लुटायला असतात. आजच्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील गाव खेड्यात शुकशुकाट असतो निर्मनुष्य असते. कर्कश असणारा आवाज, लोकांची वर्दळ, असणारी शहरे, गावे आज शांत असतात.

बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भाजी (भज्जी), गव्हाची खीर, दही, धपाटे, अंबील या पदार्थाना प्राधान्य दिले जाते. वनभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर डहाळे, ऊस, बोरे व मधाचा समाचार घेतला जातो. सायंकाळी उत्तर पूजेनंतर गोवरीच्या खांडावर मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते. दूध उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगले पीक येणार असे गृहीत धरले जाते. 

या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात.

या दिवशी सगळ्याचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायच या सणाची पुढच्या वर्षी पर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते.

येळ अमावस्येनंतर थंडी कमी होते असे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी पेटवलेल्या पलित्याने (हेंडगा) थंडीला चटका बसतो, असा समज आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणात बदल झाल्यामुळे येळ अमावस्येनंतरच खऱ्या थंडीला प्रारंभ होत आहे. मात्र, पूर्वापार सुरू असलेली ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. 

काळ्या आईवर श्रद्धापूर्वक प्रेम केले पाहिजे, तिच्या भरणपोषणाची काळजी घेतली पाहिजे व मातेप्रमाणेच तिच्याशी नाते जोडले पाहिजे हा संस्कार देणारा सण म्हणजे येळ अमावस्या. त्यामुळेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संकलन : 

अजय आदाटे, मंगळवेढा.



test banner