सानेगुरुजी जयंती आणि त्यांचं पंढरपूर नातं. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

सानेगुरुजी जयंती आणि त्यांचं पंढरपूर नातं.

 


‘जावो साने सीमा पार, नही खुलेगा विठ्ठल द्वार’, या घोषणेनंतरही साने गुरुजींनी पंढरपुरात दिलेला लढा काय आहे?

खास सानेगुरुजी यांच्या जयंती निमित्त घेतलेला आढावा.


साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाचा इतिहास काय, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्याचे सामाजिक पडसाद काय पडले, या सत्याग्रह स्मारकाची निर्मिती कशी झाली, त्याचं महत्त्व काय अशा अनेक मुद्द्यांचा हा खास आढावा.


सानेगुरुजींच्या  स्वतः ब्राह्मण जातीतून आले असतानाही साने गुरुजींनी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन सत्याग्रह केला आणि वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार पुढे नेला. 


स्वातंत्र्याचे युद्ध थांबून भारतीयांना स्वातंत्र्य मिळणार होते आणि त्याच वेळेस सामाजिक बदलासाठी साने गुरुजींनी लढा सुरू केला होता. महाराष्ट्रातील दीन दलितांसाठी पंढरपूरचे प्राचीन मंदिर खुले व्हावे यासाठी प्रबोधन करत अनेक सभा घेतल्या होत्या. मात्र त्यातून मानसिक प्रबोधनाची प्रक्रिया घडत होती, मात्र मंदिर खुले झाले नव्हते. अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजी यांनी उपोषणाचा निर्णय जाहीर केला.


साने गुरुजींचे पत्रक : 


“पंढरपूरचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे, पांडुरंगाच्या पायांवर त्यांना डोके ठेवता यावे, यासाठी आज एकादशीपासून मी उपवास करीत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे, की त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन. “महाराष्ट्रातील हजारो गावांतील सर्व बंधु-भगिनींना, तसेच शहरातील बंधु-भगिनींना माझी प्रार्थना, की तुम्ही भराभरा पुढे येऊन ही अस्पृश्यता समूळ नष्ट करा. प्रचंड लाट सर्व महाराष्ट्रभर उसळू दे आणि हे पाप धुवून जाऊ दे.”


या जाहीर पत्रकापूर्वी साने गुरुजींनी आचार्य विनोबा भावे यांना लिहिलेल्या पत्रात मनातील अस्वस्थता व्यक्त करताना लिहिले की,अस्पृश्यता निवारणासाठी, जातीय ऐक्यासाठी, खादी इत्यादी कार्यासाठी मनात सतत तळमळ चाललेली असते. हे करताना आतून इतकी विलक्षण शांती अनुभवतो की तितकी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. या पत्राला उत्तर देताना विनोबा म्हणतात, हिंदू समाजात बुद्ध , शंकर, ज्ञानदेव, मीरा इत्यादी सत्पुरुषांचा भरपूर छळ झाला आहे, तथापि हिंदू धर्माने एकाही संताला ख्रिस्त किंवा साॅक्रेटिस होवू दिले नाही.


दलितांना मंदिर खुले करू नये असे वाटणार्‍या बडव्यांनी ‘जाओ साने भिमापार नही खुलेगा मंदिर द्वार’ अशा घोषणा देऊन साने गुरुजी उपोषणाला विरोध केला होता. मात्र सामाजिक दबाव वाढल्यानंतर 10 मे रोजी साने गुरुजींचे उपोषण सुटले आणि महाराष्ट्रातील दीनदलितांना पंढरपूरचे मंदिर खुले झाले. साने गुरुजींच्या उपोषणाला 76 वर्षे पूर्ण, पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी झाले खुले. आज अश्या आदरणीय सानेगुरुजी यांची जयंती.


महाराष्ट्रातील पंढरपूरचा विठोबा हा सामान्य जनतेसाठी चे आराध्य दैवत आहे. ते मंदिर प्राचीन होते ते सर्वांसाठी खुले व्हावे अशी पुरोगाम्यांची मागणी होती. त्यासाठी साने गुरुजी यांनी पंढरपूरच्या मंदिर खुले व्हावे, यासाठी 1 मे रोजी उपोषण सुरु केले. तशी घोषणाही अगोदर केली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. मात्र त्यांच्या उपोषणाला पंढरपुरातील बडव्यांनी विरोध केला होता. पंढरपुरात उपोषणाला त्यांना जागा देण्यात अडचण निर्माण करण्यात आली होते.


अनेक संतांच्या वाटाही बंदच


संत परंपरेने महाराष्ट्रातील जातीयता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र येथील जातिभेदाचा त्रास संताना देखील झाला होता. विठ्ठल मंदिर खुले व्हावे ही मागणी होती मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाच्या दिंड्या दरवर्षी पंढरपूरला जात होत्या. मात्र त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. रोहिदास दिंडी, चोखामेळा दिंडी, अजमेळा दिंडी या विविध समाजाच्या दिंड्या यांना सवर्णांच्या दिंड्या पासून वेगळे काढले जात होते. या जातीच्या दिंड्यांना भीमा नदीच्या काठावर सोपविले जात असे व इतर दिंड्या पंढरपूरला पोहचत असे.


गांधीजींचे ऐकले नाही


सानेगुरुजी हे अत्यंत मातृहृदयी होते. ते निस्सीम गांधीभक्त होते. गांधीजींवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. सानेगुरुजी उपोषणाला बसले तेव्हा काही उपोषण विरोधकांनी गांधीजींचा गैरसमज करून दिला. साने गुरुजी यांनी उपोषण मागे घ्यावे. सरकार लवकरच कायदा करत आहेत. त्यामुळे मंदिर तात्काळ खुले होईल अशी तार गांधीजींनी गुरुजींना पाठवली. गुरुजींना वास्तव माहीत होते ही बाब लक्षात घेऊन, वास्तव नेमके काय आहे हे सांगणारी तार गुरुजींनी महात्मा गांधी यांना पाठवली. मात्र आपण उपोषण माघार घेणार नाहीत असेही कळवले. त्यानंतर या राज्यातील अनेक नेत्यांनी सानेगुरुजी उपोषणाला पाठिंबा दिला उपोषणाचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन बडव्यांना मंदिर खुले करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. गांधीजींच्या आदेशाने साने गुरुजी उपोषण सोडतील हा उपोषण विरोधकांचा भ्रम खोटा ठरला. आणि त्यानंतरच मंदिर खुले झाले.


दोनशे मंदिरे खुली


पंढरपूरचे मंदिर खुली झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक गावात समतेचा जयघोष सुरू झाला. महाराष्ट्रातील सुमारे 200 मंदिर अस्पृश्यांसाठी खुली झाली. या उपोषणाने राज्यातील अनेक पाणवठ्याच्या विहिरी दलितांसाठी खुल्या करण्यात आल्या. हरिजन सेवक संघाने घेतलेल्या स्वाक्षरी मोहीम लाखो लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. पंढरपूरचे मंदिर खुले झाल्यानंतर राज्यात परिवर्तनाची लढाई वेगाने सुरू झाली. त्याचा परिणाम गावोगावी मानसिक परिवर्तन होण्याबरोबर दलितांच्या असलेल्या भेदाच्या भिंती संपुष्टात येण्यास मदत झाली.



नगरकर गुरुजींना मदतीसाठी पुढे सरसावले


दलितांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी सानेगुरुजी उपोषणाला बसणार होते. मात्र पंढरपुरात उपोषणाला जागाच मिळू नये अशी तजवीज विरोध करणार्‍यांनी केली होती. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. या उपोषणाला जागा मिळावी म्हणून स्वतः गाडगे महाराजांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. अनेकांच्या प्रयत्नानंतर अहमदनगर येथील रहिवासी असलेले व पंढरपुरात स्वतःचा मठ स्थापन केले बद्रीनारायण तनपुरे महाराज यांच्या मठाची जागा उपोषणाला मिळाली. त्या मठातच गुरुजींनी उपोषणाला प्रारंभ केला आणि त्याचे फलित म्हणून विठ्ठल मंदिर दलितांना खुले झाले. या संघर्षात नगरकरांचा ही मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे.


अजय आदाटे, मंगळवेढा.



test banner