सामाजिक जाणिवेच्या प्रतिभेची सकस अभिनयाद्वारे रसिकांसमोर उधळण करत रसिकांच्या जाणिवा समृद्ध करण्याचा खटाटोप महत प्रयासानं रंगभूमीवर सादर करणं आणि तो रसिकांच्या पसंतीला उतरणं हे अभिनय कौशल्याच व्रत घेतलेल्या कोणाही कलाकाराच्या दृष्टीने आनंदपर्वणीच.
समाजभान जपणूक करत आणि समाजातील विविध प्रश्नांची उकल साभिनय सादर करणं ही कलाकारांच्या सादरीकरणाची परीक्षाच. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रश्नांची मांडणी आपल्या कलाविष्कारातून अप्रतिम सादर व्हावी ही केवळ प्रांजळ भावना कलाकारांना आनंद देवून जाते. सामाजिक प्रश्नांचा भडिमार होत असताना त्यावर उपाययोजनांची दिलासायुक्त फुंकर रसिकांना अंतर्मुख करत त्या प्रश्नाकडे नकळत आकृष्ट होणं आणि त्यावरील भाष्य रसिकांना मंत्रमुग्ध करतं.
माझ्या लेखनप्रपंचासाठी निमित्त आहे ते म्हणजे मंगळवेढ्यात भरलेले पहिले शिवार नाट्यसम्मेलन होय. मंगळवेढा नगरीमध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या शिवार नाट्यसंमेलनाच्या देखण्या स्वरुपात साकार झालेला कलाविष्कार पाहण्याचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं किंबहुना सर्व कार्यक्रमाच्या एका वेगळ्या आनंदाने मनाला भारावून टाकले.
नाट्यदिंडीपासून सुरू झालेला हा दिमाखदार सोहळा मंगळवेढा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. शिवार नाट्यसम्मेलनाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी झटलेले शेकडो हात सम्मेलनाच्या यशाच्या पाठीमागे होते हे वेगळे सांगायला नको. मंगळवेढा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम, नियामक मंडळच्या सदस्या तेजस्विनी कदम, अॅड. सुजीत कदम आणि इतर कलाकरांच्या प्रगल्भतेतून साकार झालेले हे सम्मेलन अनोखे ठरले आणि त्याची परिणामकारकता कितीतरी पटीने आनंददायी ठरली.
नाट्यक्षेत्रासाठी लाभलेले अनेकांनेक हिरे या मंगळवेढा नगरीमध्ये चमकत आले आहेत. आणि ते रसिकांच्या मनातील ताईत झाले. माझ्यासारख्या एका शिक्षकाला किंबहुना नाट्यरसिकाला इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावरील गुरुवर्य दत्तात्रय जमदाडे, स्व. विजयकुमार भालके, स्व. रामचंद्र थिटे, यतिराज वाकळे यांनी अप्रतिम सादरीकरण केलेल्या त्यांच्या नाटकातील अभिनयाने मला नाट्यक्षेत्राकडे खेचले. शालेय वातावरणामध्ये मी नाट्यवेडा झालो. विनोदी नाट्य सादरीकरणाबरोबर कौटुंबिक आणि सामाजिक जिव्हाळ्याच्या नाट्य प्रेमात मी पडलो. आणि जवाहरलाल हायस्कूलमध्ये दरवर्षी एकांकिका सादरीकरण करू लागलो. पुढे तर मुख्य पात्र साकारण्याची संधी मिळाली. आता नाटकात सहभाग नाही परंतु ती नाट्य आवड आजतागायत मी मनापासून जोपासत आलो आहे.
मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ५५ वर्षाच्या प्रदीर्घ नाट्य परंपरेत तेजस्विनी कदम यांनी आम्हाला सहभागी करून नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी दमदार पाऊल टाकले आहे. असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. "उद्देश्य पावलांचा जाणे पुढेच जाणे " याप्रमाणे सकस आणि निरोगी नाट्य चळवळ उभी करण्यासाठी प्रत्येक पावलांचा उद्देश्य हा पुढे जाणेच असावा अशी मनीषा तेजस्विनी कदम यांची राहिली आहे आणि पुढेही राहील असा विचार मनाला स्पर्शून जातो.
मनुष्यबळ, आर्थिक बाजू, परिश्रमपूर्वक धडपडणं या कितीतरी गोष्टी शिवार नाट्यसंमेलनासाठी यापूर्वी प्रकर्षाने जाणवणा-या होत्या. परंतु अॅड. सुजीत कदम यांच्या आखीव आणि रेखीव नियोजनामध्ये याची कमतरता जराही भासू दिली नाही. रसिकांच्या चेह-यावर निर्भेळ आनंद पसरवणं आणि तो दिसणं यासाठी पैशापेक्षा त्या पाठीमागे असलेली निर्मळ भावना होय. नाट्यपरिषद शाखा मंगळवेढा यांच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांसह सर्वजण झटले म्हणण्यापेक्षा सर्वांनी या संमेलनाचा आनंद घेतला आणि तो वितरित केला आणि द्विगुणितही केला.
नाट्यचळवळीतील यतिराज वाकळे, दिगंबर भगरे, अशपाक काझी, बालाजी शिंदे यांचेसह लहू ढगे, हरिप्रसाद देवकर या रसिक सदस्यांच्या मांदियाळीत माझ्यासह अनेकांना अत्यंत आवडीने आणि रसिकतेच्यादृष्टीने आनंद घेता आला. या संमेलनात मान-सन्मान या गोष्टी कुणाच्याही मनाला शिवल्या नाहीत. उददात आणि उन्नत आणि पवित्र कार्य करणा-यासाठी सर्वांची सदैव साथ असते असे यावेळी प्रकर्षाने जाणवले. अखिल भारतीय नाट्य परिषेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनीदेखील आपल्या मनोगतात या शिवार नाट्य समेलांनाच्या संकल्पेनेचे कौतुक करत मंगळवेढा शाखेचे हे कार्य असेच पुढे न्यावे आणि इतरांनीही याचे अनुकरण करावे अशी मनोकामना व्यक्त केली.
आणखी एक सुखद अनुभव म्हणजे या संमेलनाचे अध्यक्ष अजय तपकिरे. आकर्षण अध्यक्ष म्हणून तर होतेच परंतु त्यांनी केलेलं वैचारिक भाषण आणि मुद्देसूपणे मांडलेले मनोगत. रसिक श्रोते त्यात गुरफटून गेले. त्यांनी कोणत्याही ध्येयवेड्या कलाकारांसाठी घ्यावी लागणारी कठोर परिश्रमाची भूमिका आणि अविरत धडपडण्याची वृत्ती यांसाठी त्यांनी दिलेली उदाहरणे नाट्य रसिक व कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारी होती. अशा अध्यक्षासोबत फोटो काढण्याचा मोह यावेळी मला आवरता आला नाही.
कलासक्त भावनेनं आणि पोटतिडकीनं बोलणं आणि मंनापासून बोलण्याची प्रचिती स्वागताध्यक्षा तेजस्विनी कदम यांच्या मनोगतातून आली.
रंगमंच, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना या बाबी कौतुकास पात्र होत्या. डामडौल आणि छानछोकी यापेक्षा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून उतराई होण्याचा प्रयत्नच या शिवार नाट्य सममेलनाचे वैशिष्ठ्य होतं.
महाराष्ट्रातून मंगळवेढ्यात प्रथमच शिवार नाट्य संमेलनाचे सूप वाजले आणि उर्वरित महाराष्ट्रातून याप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची उर्मी अनेकांनी बोलून दाखवली. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मंगळवेढ्याने जे शिवधनुष्य पेलले. त्याची वाहवा सर्वदूर पसरली. खरोखर ग्रामीण भागातील कलाकारांना जगण्याचे बळ मिळाले. याची प्रचिती विविध शाखांतून सहभागी झालेल्या कलाकारांमधून जाणवत होती. नव्हे ते तेज डोळ्यात दिसत होते. चेह-यावरील आनंद ही त्यांच्या कामाची पोहोच पावतीच होती. पथनाटये, पोवाडा, लावणी, लघुनाटिका, भारुड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम केवळ दर्जेदार आणि डोळ्याचं पारणं फेडणारे होते.
कार्यक्रमाच्या निवेदनासाठी राजेद्रकुमार जाधव, बालाजी शिंदे, अशपाक काझी, सुलेमान तांबोळी, बापू सावळे, भारत दत्तू, पल्लवी वाकळे, स्वाती दिवसे, रेश्मा गुंगे, आलिया कादरी आदींनी उत्तमरित्या कार्य पार पाडले.
लहानांपासून युवक - युवती तसेच ज्येष्ठ कलाकारांचा रंगमंचावरील वावर नाट्य रसिकांना एक आनंदपर्वणी देवून गेला.
मंगळवेढा नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अॅड. सुजीत कदम, तेजस्विनी कदम, डॉ. मिनाक्षीताई कदम यांच्यासह सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आणि सहकार्याने सुरू असलेल्या नाट्य चळवळीस आणखी एक मोठे यश प्राप्त झाले. मंगळवेढ्यासह ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मंगळवेढा नाट्य परिषदेच्या या नाट्य चळवळीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद.
गणेश यादव
सदस्य
अ. भा. नाट्यपरिषद, मुंबई
शाखा -- मंगळवेढा.