मंगळवेढा: मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबकडून दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहीमचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सदर ऐतिहासिक सायकल मोहीम होणार असुन मोहिमेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी काढण्यात आलेल्या पोस्टर्सचे पुजन व अनावरण शिवप्रेमी चौकातील शिवालय येथे खटावकर मार्टचे प्रमुख आनंद (पिंटू) खटावकर व सुहास ताड यांच्या हस्ते करण्यात आले
. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे,अनिल मुदगुल,माजी अध्यक्ष शरद हेंबाडे,प्रा विनायक कलुबर्मे, सतिश दत्तू,अरूण गुंगे,सुदर्शन ढगे, चंद्रकांत चेळेकर,स्वप्निल फुगारे,आदीजण उपस्थित होते.
स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना रायगड हा मूर्त साक्षीदार आहे. किल्ल्यावरील जगदीश्वर मंदीर,बाजापेठा,छत्रपती शिवरायांची समाधी,राजवाडा,वाडे,महादरवाजा,शिरकाई मंदीर,राजदरबार,अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज तर पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा व समाधी ही ठिकाणे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत हे खरे देशाचे वैभव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच शिवकाळात जसा रायगड होता तसाच रायगड पुन्हा एकदा सर्वांना याची देही याची डोळा पाहता यावा त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबकडून मंगळवेढा ते रायगड या ऐतिहासिक सायकल मोहिमेतून जनजागृती करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ला जतन,संवर्धन व पर्यटन विकास करण्याचे काम हाती घेण्यासाठीही वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे सदर सायकल मोहीमेकरीता खटावकर मार्टचे विशेष सहकार्य लाभणार आहे तरी इच्छुकांनी ७२७६८६०८४२ व ९४०३४५१२९७ या क्रमांकावरती संपर्क करुन नाव नोंदणी करावी असे आवाहन वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.